निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना 29 हजारांचा बोनस मिळणार, 27 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा
‘बेस्ट’ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या वर्षी दिवाळीत बोनसपासून वंचित राहिलेल्या 27 हजार कर्मचाऱयांना आता निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने पुढील दोन दिवसांत 29 हजार रुपयांचा बोनस मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बोनस देण्यासाठी पालिकेकडून ‘बेस्ट’ला 80 कोटींचा निधी मिळाला आहे. याबाबत आज बेस्ट कामगार सेना आणि कृती समितीची ‘बेस्ट’ महाव्यवस्थापकांशी चर्चा झाल्यानंतर प्रशासनाकडून हे आश्वासन देण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक डोलारा कोलमडलेल्या ‘बेस्ट’ला आपल्या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अनुदान घ्यावे लागत आहे. बेस्ट कामगार सेनेकडून पाठपुरावा केल्यानंतर दिवाळीआधी याबाबत ‘बेस्ट’ प्रशासनाकडून पालिकेकडे निधी मिळण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावाही करावा लागतो. विशेष म्हणजे या वर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे हा पाठपुरावा निवडणूक जाहीर होण्याआधी करणे अनिवार्य होते. मात्र अशी कोणतीही तसदी ‘बेस्ट’ प्रशासनाने घेतली नसल्याने आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे कर्मचाऱयांना दिवाळीत बोनस मिळाला नाही. मात्र आता निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने बेस्टच्या कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली.
बेस्ट कामगार सेनेचा पाठपुरावा,
तीन हजारांची घसघशीत वाढ
पालिका कर्मचाऱ्यांना 29 हजारांचा बोनस निवडणूक जाहीर होण्याआधी मिळाला असताना ‘बेस्ट’ कामगार सेनेकडून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस का दिला नाही, असा सवाल बेस्ट कामगार सेनेकडून करण्यात आला होता. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या नेतृत्वाखाली महाव्यवस्थापकांकडे वारंवार पाठपुरावाही करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाकडून आज बेस्ट कामगार सेनेसह कृती समितीसोबतही बैठक घेऊन निवडणूक आयोगाच्या परवानगीने सानुग्रह अनुदान देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. विशेष म्हणजे बेस्ट कामगार सेनेने या वर्षी 40 हजार सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. तरीदेखील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी तीन हजारांची वाढ प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List