मिचेल स्टार्कला बसला धक्का
गेल्या आठवड्यात आयपीएल संघ मालकांकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. त्यात संघ मालकांनी दिग्गज खेळाडूंना ‘डच्चू’ देत सर्वांना धक्का दिला होता. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कला कोलकता नाईट रायडर्सने मुक्त केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र मुक्त करण्यापूर्वी केकेआरने माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही, अशी खंत स्टार्कने व्यक्त केली.
मागच्या आठवड्यात केकेआरने संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. फ्रेंचायझीने गतवर्षीचा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला संघातून रिलीज केले आहे. तर 24 कोटी 75 लाख रुपये मोजून संघात स्थान दिलेल्या स्टार्कलाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र केकेआरने रिंकू सिंग (13 कोटी), वरुण चक्रवर्ती (12 कोटी), सुनील नरेन (12 कोटी), आंद्रे रसल (12 कोटी), हर्षित राणा (4 कोटी) आणि रमणदीप सिंग (4 कोटी) या पाच खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. अय्यर, स्टार्कसह फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा यांनाही रिलीज करत केकेआरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना स्टार्क म्हणाला, संघाने रिलीज केल्यानंतर अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. किमान कल्पना देण्यासाठी संपर्क साधायला हवा, असेही तो म्हणाला. तसेच आयपीएल एक फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धा आहे. मला वाटते हैदराबाद संघातील पॅट कमिन्स आणि ट्रेव्हिस हेड वगळता इतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू लिलावात उतरतील, असेही स्टार्क म्हणाला. स्टार्कने मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देत 2 महत्त्वाचे विकेट टिपले होते. मागील हंगामात त्याने एकूण 13 विकेट्स घेतल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List