महायुतीला बंडखोरांची महाडोकेदुखी; अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीला यश

महायुतीला बंडखोरांची महाडोकेदुखी; अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीला यश

विधानसभेला उमेदवारी न मिळाल्याने महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकवले होते. राज्यात 150 हून अधिक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने सर्वच पक्षांचे टेंशन वाढले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या बहुतांश अपक्षांनी माघार घेतली. मात्र महायुतीत ठिकठिकाणी बंडखोरांनी शेवटपर्यंत अर्ज मागे न घेतल्याने ती महायुतीसाठी महाडोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, अलिबागमध्ये शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्यासाठी शिवसेनेच्या सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत मोठय़ा प्रमाणत बंडखोरी झाल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली होती. भाजपच्या 52 शिंदे गटाच्या 12 आणि अजित पवार गटाच्या 16 जणांनी बंडखोरी केल्यामुळे महायुतीच्या  35 हून अधिक जागा धोक्यात आल्या होत्या. बंडखोरी क्षमविण्यासाठी भाजपच्या पेंद्रातील व राज्यातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. महाविकास आघाडीतही काही ठिकाणी बंडखोरी झाली होती. शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रस, कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेत पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. राज्यातील 288 मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिल्याने तिरंगी-चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये ज्योती मेटे यांची बंडखोरी

शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या ज्योती मेटे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही.

श्रीगोंद्यात भाजपच्या प्रतिभा पाचपुते यांची मुलासाठी माघार

श्रीगोंद्यातील भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुलगा विक्रम पाचपुते याच्यासाठी त्यांनी माघार घेतली आहे. भाजपने मुलगा विक्रम पाचपुते याला तिकीट द्यावे, यासाठी बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते आग्रही होते. देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मुलाला उमेदवारी देण्याचा आग्रह केला होता. मात्र प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती.

अक्कलकुव्यात शिंदे गटाला भाजपच्या गावीत यांचे आव्हान

नंदुरबार जिह्यातील अक्कलकुवा येथे शिंदे गटाच्या आमश्या पाडवी यांच्यासमोर भाजपच्या माजी खासदार हीना गावीत यांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. आदिवासी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून भाजपला रामराम ठोकलेले माजी मंत्री पद्माकर वळवी हे भारत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून के. सी. पाडवी रिंगणात आहेत.

सरवणकरांना पायरीवरून हाकलले

मिंधे गटाकडून माहीममधून लढणारे सदा सरवणकर यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पायरीवरून हाकलले. सरवणकर यांच्यावर माघारीसाठी भाजप आणि मिंधेंचा दबाव होता. आम्ही सरवणकर यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यात आज सरवणकर नवे डील घेऊन राज यांच्या पायरीपर्यंत गेले होते. मात्र, त्यांना आणि त्यांच्या मुलाला पायरीवरूनच हाकलण्यात आले. दरम्यान, सरवणकर यांनी माघार न घेता आपला अर्ज कायम ठेवला आहे.

 

नाशिकमध्ये बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश; समीर भुजबळ, राजश्री अहिरराव, केदा आहेर रिंगणात

नाशिकमध्ये बंडखोरी रोखण्यात महायुतीला अपयश आले आहे. नांदगावातून समीर भुजबळ, देवळालीतून राजश्री अहिरराव, तर चांदवडमधून केदा आहेर हे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध रिंगणात उतरले आहेत. नांदगावमधून शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे उमेदवार आहेत. अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष म्हणून कांदे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. अजित पवार गटावर दबाव टाकण्यासाठी शिंदे गटाने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देवळाली मतदारसंघात राजश्री अहिरराव यांना खास हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पोहचविला. अर्ज दाखल केल्यापासून अहिरराव या नॉट रिचेबल होत्या. माघारीसाठी आज महायुतीने शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव केली; परंतु त्यांचा संपर्कच झाला नाही. त्यांचा एबी फॉर्म रद्द करण्याचे पत्र शिंदे गटाने निवडणूक निर्णय अधिकाऱयांना दिले. निवडणूक आयोगाने हे पत्र फेटाळल्याने अहिरराव यांची शिंदे गटाची उमेदवारी कायम राहिली. या मतदारसंघातील अजित पवार गटाच्या उमेदवार आमदार सरोज आहिरे या अडचणीत आल्या आहेत. दिंडोरीतून शिंदे गटाचे धनराज महाले यांची माघार घेण्यात यश आले. चांदवडमध्ये आमदार राहुल आहेर यांना भाजपने तिसऱयांदा उमेदवारी दिली आहे. त्यांचे चुलत बंधू केदा आहेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपची काsंडी झाली आहे.

निवडणुकीतून यांची माघार

महायुती

भाजप ः गोपाळ शेट्टी – बोरीवली, विश्वजीत गायकवाड – लातूर, विजयराज शिंदे – बुलढाणा, किशोर समुद्रे – मध्य नागपूर, अमित घोडा- पालघर, शिवाजी उर्फ पप्पू डोंगर – सांगली, किरण ठाकरे- कर्जत खालापूर, संदीप सरोदे – कोटोल, संगीता ठोंबरे – केज. शिंदे गट ः स्वीकृती शर्मा – अंधेरी पूर्व, जगदीश धोडी – बोईसर, प्रशांत लोखंडे – श्रीरामपूर, सुरज सोळुंके – धाराशीव, धनराज महाले- दिंडोरी, अविनाश राणे – अणुशक्तीनगर, राजू पारवे – उमरेड. अजित पवार गट ः नाना काटे – चिंचवड, सुजित झावरे पाटील- पारनेर, राजेभाऊ फड – परळी, नरेश अरसडे- काटोल, सुबोध मोहीते – काटोल, अब्दूल शेख – नेवासा.

महाविकास आघाडी

शिवसेना ः  बाबुराव माने – धारावी, सुरेंद्र म्हात्रे – अलिबाग, उदय बने- रत्नागिरी, मकरंदराजे निंबाळकर – धाराशीव, कुणाल दराडे – येवला, रणजीत पाटील – परंडा. कॉँग्रेस ः मधू चव्हाण – भायखळा, तानाजी वनवे – नागपूर पूर्व, सुहास नाईक – शहादा तळोदा,  विश्वनाथ वळवी – नंदुरबार, मदन भरगड- अकोला, दिलीप माने -सोलापूर, हेमलता पाटील – नाशिक मध्य, राजश्री जिचकार – काटोल, अविनाश लाड -रत्नागिरी. राष्ट्रवादी कॉँग्रेस ः जयदत्त होळकर – येवला, संदीप बाजोरिया – यवतमाळ, संगीता वाझे -मुलुंड, मिलिंद कांबळे – कुर्ला.

इतर उमेदवार ः जयदत्त क्षीरसागर – अपक्ष बीड, तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली,  अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य, जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला, वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल.

 

कोल्हापूर उत्तरमधून कॉँग्रेस उमेदवारच रिंगणातून बाहेर

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉँग्रेसने राजेश लाटकर यांना दिलेली उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. दरम्यान लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज सकाळपासून राजेश लाटकर उमेदवारी अर्ज माघारी घेणार की नाही अशी चर्चा असतानाच उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना नाटय़मय घडामोडी घडल्या आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनीच माघार घेतली.

 

केजमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा

बीड जिल्हय़ात भाजपला निवडणूक पुन्हा एकदा जड जाणार आहे. केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र संगीता ठोंबरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला असून या मतदारसंघातील गणित बदलले आहे.

 

रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील विश्वास नांदेकर – जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल – झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी -मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे – वणी तालुकाप्रमुख यांचीही पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात तुफान राडा, काय कारवाई होणार? निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात तुफान राडा, काय कारवाई होणार? निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया
भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आला...
Vinod Tawade : विनोद तावडे यांचा गेम? 5 कोटी घेऊन आल्याची भाजपमधूनच टीप, हितेंद्र ठाकुरांचा गौप्यस्फोट
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआनं नोटाचे बंडलच दाखवले, exclusive Photos
निवडणुकीतील भाजपचा खेळ संपला…नालासोपरातील प्रकरणानंतर संजय राऊत यांचा हल्ला
पैशांचं बंडल सापडल्यानंतर ठाकूर पिता-पुत्र आणि तावडेंची पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली, आता पुढे काय?
धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा टिझर प्रदर्शित
लग्नानंतर माधुरीने का सोडली इंडस्ट्री? 25 वर्षांनंतर पश्चात्ताप? म्हणाली “माझी मुलं..”