उद्धव ठाकरे यांची तोफ कोकणात धडाडणार; रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदारसंघांत जाहीर सभा
दिवाळीच्या आतषबाजीनंतर आता कोकणात निवडणूक प्रचाराचे फटाके फुटणार आहेत. कोकणातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी ( दि.5 नोव्हेंबर रोजी) रत्नागिरीमध्ये होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचारसभा मंगळवारी सायंकाळी 6 वाजता साळवीस्टॉप येथील जलतरण तलाव येथील मैदानावर होणार आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या 5 जागा आहेत. त्यामध्ये दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या मतदार संघांचा समावेश आहे. रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदार संघासाठी मंगळवारी रत्नागिरीत जाहीरसभा होत आहे. या सभेमध्ये कोकणातील महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे बाळ माने आणि राजापूर विधानसभा मतदार संघातून राजन साळवी निवडणूक लढवत आहेत. दोन्ही उमेदवारांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
कोकणातील प्रचाराची पहिली सभा रत्नागिरीत होत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी दुपारी 12 वाजता कोल्हापूर येथे अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेणार आहेत. कोल्हापूर येथील प्रचारसभा आटपून ते सायंकाळी 5 वाजता रत्नागिरीत पोहोचतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता साळवीस्टॉप येथील जलतरण तलावाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते आमदार राजन साळवी, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, सचिन कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके, संजय कदम, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने उपस्थित राहणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List