“आमिरची हीच गोष्ट मी फार सहन करते…”; पूर्व पत्नी किरण रावचा खुलासा
अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 16 वर्षांनंतर 2021 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. मुलगा आझादचंही संगोपन दोघं मिळून करत आहेत. इतकंच नव्हे तर विविध प्रोजेक्ट्सवरही दोघं एकत्र काम करत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण आमिरविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आमिरबद्दल तिला काय आवडतं, काय आवडत नाही आणि त्याच्याबद्दल कोणती गोष्ट ती सहन करते, याविषयी किरणला प्रश्न विचारण्यात आला. अभिनेत्री करीना कपूरला दिलेल्या मुलाखतीत किरणला हा सवाल करण्यात आला.
करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमेन वाँट’ या शोमध्ये किरण म्हणाली, “आमिर हा 100 टक्के प्रयत्न करणारा माणूस आहे. जर त्याला एखादी गोष्ट आवडली की तो त्यामागे पूर्णपणे मेहनत घेतो. तो आपले 100 टक्के त्या गोष्टीला देतो. पण जर त्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याबद्दल तो प्रामाणिकपणे सांगतो. आवडीच्या गोष्टीसाठी तो त्याचे सर्व प्रयत्न करतो. एक क्रिएटिव्ह व्यक्ती म्हणून त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा सर्वोत्कृष्ट असतो.” आमिरची हीच गोष्ट सर्वाधिक आवडत असल्याचं किरणने सांगितलं.
यापुढे आमिरची न आवडणारी गोष्ट कोणती, याविषयी सांगताना किरण म्हणाली, “तो एखादा निर्णय लवकर घेत नाही, ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. तो त्याचा पूर्ण वेळ घेतो आणि प्रत्येक गोष्टीचा विचार केल्यानंतर निर्णय घेतो. एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी आधी तो सर्व गोष्टींची पूर्णपणे पडताळणी करतो आणि मगच निर्णय घेतो. पण ही गोष्ट समोरच्या व्यक्तीसाठी खूप चिड आणणारी ठरू शकते. कारण त्याच्या हाती आधीच 20 वेगळी कामं असतात. त्यात तुमच्या निर्णयाचा क्रमांक तिसरा किंवा चौथा असला तरी त्यासाठी तुम्हाला खूप प्रतीक्षा करावी लागते.”
आमिरच्या स्वभावाची आणखी एक गोष्ट किरणने या मुलाखतीत सांगितली. आमिरबद्दल कोणती गोष्ट तू सहन करतेस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर किरण म्हणाली, “तो कोणत्याही विषयावर लेक्चर देऊ शकतो. कधीकधी तो काही गोष्टींबद्दल इतके मोठे लेक्चर देत असतो, जे मला अजिबात आवडत नाही. टिपिकल महिलांबद्दल ते लेक्चर नसतात, पण थोडेफार त्यातच मोडणारे असतात. त्याची हीच गोष्ट मी सहन करते.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List