टीम इंडियाला शेवट गोड करण्याची संधी; पण वानखेडेवर धावांचा पाठलाग सोपा नाही, वाचा झोप उडवणारी आकडेवारी
हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू आहे. हा सामना रोमांचक वळणावर आला आहे. आतापर्यंत अवघा दोन दिवसांचा खेळ झाला असून तब्बल 29 विकेट्स पडल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 9 विकेट्स गमावून 171 धावांपर्यंत मजल मारली होती. एजाज पटेल 7 धावांवर नाबाद असून न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी आहे.
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे शेपूट वळवळण्याआधीच हिंदुस्थानला शेवटचा गडी झटपट बाद करावा लागणार आहे. त्यामुळे छोट्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून मालिकेचा शेवट गोड करण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानकडे आहे. मात्र वानखेडेवर चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणे एवढे सोपेही नाही. आकडेवारीही याची साक्ष देते. चौथ्या डावात फक्त एकदाच 100 हून अधिक धावांचा या मैदानावर यशस्वी पाठलाग करण्यात आलेला आहे. 2000 साली दक्षिण आफ्रिकेने हा कारनामा केला होता.
जवळपास 24 वर्षांपूर्वी वानखेडेवर दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्स गमावून 163 धावांचे आव्हान पार केले होते. आता याच कामगिरीचा गित्ता हिंदुस्थानच्या संघाला गिरवावा लागणार आहे. या मैदानावर हिंदुस्थानने फक्त एकदाच चौथ्या डावात आव्हानाचा पाठलाग यशस्वीरित्या केला आहे. 1984 मध्ये हिंदुस्थानने इंग्लंडच्या संघाने दिलेले 48 धावांचे आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण करत सामना जिंकला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List