सागर बंगल्यावर युक्रेन हल्ला करणार का? फडणवीस यांची सुरक्षा वाढवल्यामुळे राऊत यांचा टोला
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नाही. एकीकडे आमची सुरक्षा काढून घेतली आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना कोणापासून धोका आहे, हे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगायला हवे. त्यासाठी हवे तर त्यांनी संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर युक्रेन किंवा इस्त्रायल हल्ला करणार आहे की काय? फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का? ज्यांनी त्यांना काही आश्वसने दिली होती तो पूर्ण झाला नाही, त्यांच्यापासून धोका आहे का? असा उपाहासात्मक टोला संजय राऊत यांनी लगावला.
अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचे समर्थन
सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविषयी भाजप नेते कोणत्या भाषेत बोलले होते. ते जरा काढा. भाजपने त्यावेळी ‘इम्पोर्टेड माल’ हा शब्द वापरला होता. त्यावेळी आक्षेप घेतला गेला नाही. तो शब्द चालत होता. आता शायना एन.सी. यांच्यासंदर्भात अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण केले आहे. त्यांनी ‘इम्पोर्टेड माल’ हा शब्द वापरला त्याचा अर्थ बाहेरुन आयत केलेला व्यक्ती आहे. त्या स्थानिक उमदेवार नाही, असे त्यांना म्हणायचे होते. त्यांनी केलेले वक्तव्य गंभीर नाही. अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे.
संकटात मोदी नसतात…
ज्या ठिकाणी निवडणूक आहे, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतात. परंतु ज्या ठिकाणी संकट असते, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी नसतात. गृहमंत्री नसतात. कश्मीरमध्ये संकट असताना ते गेले नाही. मणिपूरमध्ये संकट असतानाते गेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. मुंबईतील माहीम, दादार हा भाग शिवसेना उबाठाचा बालेकिल्ला आहे. त्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून येईल, असे राऊत यांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List