भाजपच्या प्रशांत परिचारकांचे बंड झाले थंड; समर्थक मात्र ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यावर ठाम
सुनील उंबरे
गेल्या निवडणुकीत मी मदत केली, या निवडणुकीत समाधान आवताडे यांनी मला मदत करावी, असा साधा प्रस्ताव प्रशांत परिचारक यांनी भाजप पक्षश्रेष्ठीकडे ठेवला होता. मात्र, या प्रस्तावाकडे फारसे गांभीर्याने न पाहाता भाजपने आमदार समाधान आवताडे यांची उमेदवारी जाहीर केली. आपल्या नेत्याला विश्वासात न घेता पक्षाने उमेदवार लादल्याने परिचारक यांच्या पांडुरंग परिवारात अन्यायाची अन् अवमानाची भावना पसरली आहे. दरम्यान, प्रशांत परिचारक यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली. बावनकुळे यांच्या शिष्टाईनंतर परिचारक-आवताडे यांचे मनोमिलन झाल्याचे प्रसिद्धिमाध्यमांना सांगण्यात आले. पक्ष नेतृत्वाच्या दबावापोटी परिचारक यांनी दोन पावले मागे जाण्याचा निर्णय घेतला असला, तरी पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते मात्र करेक्ट कार्यक्रम करण्यावर ठाम आहेत. हे मनोमिलन बैठकांमधून समोर येत आहे. त्यामुळे सन 2009च्या विधानसभेची पुनरावृत्ती होते की काय, अशी चर्चा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होताना दिसत आहे.
सन 2009 मधील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तत्कालीन विद्यमान आमदार सुधाकर परिचारक यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, हे गृहीत धरून प्रचाराचा नारळ फोडला. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांनी परिचारक यांच्यावर कुरघोडी करीत उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली होती. मोहिते-पाटील यांच्या या राजकीय कुरघोडीने नाराज झालेल्या परिचारक समर्थकांनी मतदानातून आपला वचपा काढून मोहिते-पाटील यांना पराभूत केले. त्यावेळीही परिचारक आणि मोहिते-पाटील यांचे मनोमिलन करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी शिष्टाई केली. नेत्यांचे मनोमिलन झाले; पण कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावर झालेला अन्याय आणि अवमानाचा बदला मतपेटीतून घेतला होता.
तशीच काहीशी परिस्थिती सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. या मतदारसंघात परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराची साठ ते सत्तर हजार हक्काची मते आहेत. या मतांच्या जोरावर आवताडे निवडून आले, अशी पांडुरंग परिवाराची भावना आहे. आवताडे यांनी आजवर तीन-चार निवडणुका लढविल्या आहेत. मात्र, त्यात त्यांना चाळीस ते पन्नास हजार मते मिळाली आहेत. पंढरपूर शहर आणि तालुक्यात आवताडे यांच्या गटाची मते नगण्य आहेत. मात्र, परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराची व्याप्ती दोन्ही तालुक्यांत दिसून येते. तरीदेखील भाजप पक्षश्रेष्ठाRनी परिचारक यांना रेड सिग्नल दाखविला. त्याचे कारण म्हणजे जरांगे फॅक्टरचा फटका परिचारक यांना मोठय़ा प्रमाणात बसू शकतो.
जरांगे फॅक्टरमुळे आपली उमेदवारी कापली जाऊ शकते, याची कुणकुण लागल्याने परिचारक यांनी अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी चाचपणी सुरू केली होती, तर कार्यकर्ते पक्ष बदलण्यासाठी आग्रही होते. परिचारकांची ही लंगडी बाजू पाहून भाजपने परिचारक यांना विश्वासात न घेता आवताडे यांची उमेदवारी घोषित केली.
कै. भारत भालके यांच्या निधनानंतर अडीच वर्षांपूर्वी समाधान आवताडे पोटनिवडणुकीत विजयी झाले. त्यावेळी परिचारक निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, जातीचा मुद्दा निवडणुकीत कळीचा होईल आणि आपली शीट जाईल, त्यापेक्षा आवताडे यांना उमेदवारी देणे हिताचे वाटल्याने, तेव्हाही पक्षाने परिचारक यांना डावलून उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत कै. भालके यांचे पुत्र भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे अशी चुरशीची लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत आवताडे हे 3750 मतांनी विजयी झाले. पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आवताडे यांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा होता. परिचारक यांनी काम केले नसते तर आवताडे हे आमदार झाले नसते. या निवडणुकीतदेखील परिचारक यांनी आवताडे यांना आमदार करण्याचे ठरवले तरच ते आमदार होऊ शकतात. परिचारक यांच्या पाठबळाशिवाय आवताडे यांना निवडणूक सोप्पी नाही. भाजप पक्षश्रेष्ठाRकडून परिचारक आणि आवताडे गटाचे मनोमिलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेत्यांचे मनोमिलन काही प्रमाणात शक्य आहे; पण आवताडे गटाकडून गेल्या दीड-दोन वर्षांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांना जी सापत्न वागणूक मिळाली आहे, तो अवमान आणि अन्याय कसा दूर केला जातो, त्यावर विजय अवलंबून आहे.
दरम्यान, भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून दोन उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनिल सावंत, तर काँग्रेस पक्षाकडून भगीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List