माथेरानची राणी रुसली, मिनी ट्रेन धावणार तरी केव्हा? मुहूर्त हुकल्याने पर्यटकांचा हिरमोड
दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वांची लाडकी माथेरानची राणी धावणार होती, पण ही राणी अजूनही रुसली आहे. डागडुजीची कामे जवळपास संपूनही राणी अद्याप धावत नसल्याने दिवाळीच्या सुट्टीत झुकझुक आनंद घेण्यासाठी आसुसलेल्या बच्चेकंपनीचा हिरमोड झाला आहे. त्याचा पर्यटनावरही परिणाम होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे. ही मिनी ट्रेन धावणार तरी केव्हा, असा सवाल पर्यटकांनी केला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात माथेरानची राणी सायडिंगला जाते. यंदादेखील 8 जूनपासून नेरळ-माथेरान सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. मात्र अमर लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवा सुरू होती. साधारणपणे 15 ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन पुन्हा चालू होईल अशी आशा होती, पण 1 नोव्हेंबरचा मुहूर्तही हुकला आहे. मिनी ट्रेनच्या दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून विस्टा डोम डब्यांसह इंजिनदेखील नेरळच्या लोको शेडमध्ये आणली आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील सर्व कामे संपली असून फक्त फिटनेस तपासणी बाकी आहे. ही तपासणी पूर्ण होताच पुढील आठवड्यापासून माथेरानची राणी नव्या जोमाने धावेल, असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List