भाजपच्या मेहतांनी बलात्काराचा गुन्हा लपवला; पोलीस संरक्षणाचे पैसेही लटकवले; निवडणूक आयोगाचे ‘लाडक्या उमेदवारा’ला अभय
मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, लाडका अधिकारी, लाडका ठेकेदार या खोके सरकारच्या योजनांपाठोपाठ आता निवडणूक आयोगाने लाडक्या उमेदवारांसाठी अभय योजना सुरू केली आहे. ठाणे शहर मतदारसंघापाठोपाठ या योजनेचा प्रत्यय आता मीरा-भाईंदर मतदारसंघातही आला आहे. या मतदारसंघातील भाजपचे वादग्रस्त उमेदवार नरेंद्र मेहता यांनी आपल्या शपथपत्रामध्ये बलात्काराचा गुन्हा लपवला आहे. त्यांच्याकडे पोलीस संरक्षणाची सुमारे 89 लाख रुपयांची थकबाकी असताना आपल्याकडे शासनाची कोणतीच देणी राहिलेली नाही, असे त्यांनी खोटे लिहून दिले आहे. त्यांचा हा कारनामा उघडकीस आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरवला आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून नरेंद्र मेहतांना दोन सशस्त्र पोलीस संरक्षणासाठी पुरवले जात आहेत, परंतु या पोलीस संरक्षण दिल्याचे शुल्क मात्र मेहतांनी १२ जून २०२३ पासून भरलेले नाही. सप्टेंबर २०२४ पर्यंत या थकबाकीची रक्कम तब्बल ८९ लाख १४ हजार ७०० रुपये इतकी झालेली आहे. भाजपने नरेंद्र मेहता यांना मीरा-भाईंदर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरताना मेहता यांनी कोणतीही शासकीय देणी देणे प्रलंबित नाही असे शपथपत्राद्वारे सांगितले आहे. एकीकडे पोलीस संरक्षणाचे तब्बल ८९ लाख रुपये थकबाकी असताना त्यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली. तसेच त्यांच्यावर दाखल गुन्हे याचा तपशील त्यांनी जाणीवपूर्वक शपथपत्रात दिला नाही. त्यांनी त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यात बलात्काराचे कलम लपवले. तसेच काही गुन्हे व कलमाची माहिती दिली नाही असा आक्षेप उमेदवारी अर्जाच्या पडताळणी आणि छाननीच्या वेळी अॅड. राहुल राय आदींनी घेतला होता, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भुताळे यांनी जाणीवपूर्वक मेहतांचा उमेदवारी अर्ज बाद होऊ नये म्हणून त्यांना संरक्षण देत कायदे नियम आणि न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून मेहतांच्या उमेदवारी अर्ज वैद्य ठरवला आहे.
सुरक्षा शाखेला कल्पना आहे
माजी आमदार नरेंद्र मेहता यांना दिलेल्या पोलीस संरक्षणाच्या थकबाकीबाबत पोलीस आयुक्तालयातील सुरक्षा शाखेला कळवले आहे. त्याची माहिती सांगणे हे सुरक्षा शाखेचे काम आहे, थकबाकीवर मी भाष्य करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धीरज कोळी यांनी व्यक्त केली आहे.
अधीकाऱ्यांची उडवाउडवी
नवघर पोलिसांनी सुरक्षा शाखेला काय अहवाल पाठवला हे त्यांना विचारून घ्या, आपण नवीन आलो आहोत याची माहिती वरिष्ठांची परवानगी घेऊन देतो. थकबाकीबाबत मला कोणतीच कल्पना नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List