ऐन दिवाळीत गगनबावडय़ात रिसॉर्टमध्ये छमछम; 9 बारबालांसह 31 जण ताब्यात साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहितेमुळे निवडणूक निरीक्षकांसह पोलिसांची भरारी पथके ठिकठिकाणी तैनात असून, वाहनांसह पाटर्य़ांवर करडी नजर आहे. अशातच बुधवारी रात्री उशिरा गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रूकपैकी आंबेवाडी येथील नयनील फार्म रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या पार्टीवर कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 9 बारबालांसह 31 जणांना ताब्यात घेतले. तर मद्य, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण 4 लाख 51 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऐन दिवाळीत तसेच आचारसंहिता सुरू असताना बेकायदेशीरपणे सुरू असलेला छमछम प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रूक पैकी आंबेवाडी येथील बुधवारी (दि.30) रात्री नयनील फार्म रिसॉर्टमध्ये बारबालांसोबत काही तरुण बेकायदेशीर पार्टी करत असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग व गगनबावडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या पार्टीवर रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत तोकडय़ा कपडय़ात, अश्लील व बीभत्स हावभाव करणाऱया बारबालांसह दारूचे सेवन करणारे तसेच मद्याच्या बाटल्या निदर्शनास आल्या. याप्रकरणी 9 बारबालांसह एकूण 31 जणांवर गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला. यामध्ये मुंबई, पुणे येथील काहीजणांचा समावेश आहे. यावेळी पार्टीत आढळलेला मद्य, मोबाईल फोन व इतर साहित्य असा तब्बल 4 लाख 51 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री जाधव, उपविभागिय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, श्रीकांत मामलेकर, मानसिंग सातपुते, संदीप पाटील, सागर पाटील, दिगंबर पाटील, अशोक पाटील, अमोल तेली यांच्या पथकाने ही कारवाई केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List