“दिवाळीला मला लक्ष्मीकांतची खूप आठवण येते कारण…”, प्रिया बेर्डेंनी सांगितला ‘तो’ खास किस्सा
Priya Berde Lakshmikant Berde Memories : नव्वदीचा काळ गाजवणाऱ्या आणि आजही तितक्यात लोकप्रिय असलेल्या मराठी अभिनेत्री म्हणून प्रिया बेर्डेंना ओळखले जाते. नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्याच गोष्टीत त्या कायम सक्रीय असतात. सध्या प्रिया बेर्डे या सन मराठी वाहिनीवरील ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्यांनी शकुंतला हे पात्र साकारले आहे. त्यांच्या या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली होती. यानंतर आता दिवाळीनिमित्त त्यांनी काही खास जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
“दिवाळी हा माझा अत्यंत आवडता सण आहे. पण तो माझ्यासाठी खास असतो कारण लक्ष्मीकांत आणि आमचा मुलगा, अभिनय या दोघांचा वाढदिवसही याच काळात असतो. पूर्वी आम्ही दिवाळी आणि वाढदिवस मोठ्या थाटात साजरे करायचो. संपूर्ण सिनेसृष्टीतील मान्यवरांना आमंत्रित करून हा उत्सव मोठ्या आनंदात पार पाडायचो. दिवाळी आली की लक्ष्मीकांतची खूप आठवण येते कारण त्याच्या उपस्थितीमुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा असायची. त्याला घर सजवण्यापासून पाहुणचार करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा खूप आनंद असायचा”, असे प्रिया बेर्डे म्हणाल्या.
“तो मला मदतही करायचा”
“आमच्या घरी दिवाळीची मजा पारंपरिक गोड पदार्थ आणि फराळाशिवाय अपूर्ण असते. आमच्या घरी बाहेरचं विकतचं फराळ फार आवडत नाही. त्यामुळे मी स्वतःच चकल्या, करंज्या, लाडू, आणि चिवडा बनवते. लक्ष्मीकांतला तर माझ्या हातचा फराळ विशेष आवडायचा. खास करून लाडू त्याला आवडायचे. तो मला मदतही करायचा”, अशी आठवणही प्रिया बेर्डेंनी सांगितली.
छोटी तरी रांगोळी दरवर्षी काढतेच
“दिवाळी आली की रांगोळी आलीच. मला रांगोळी काढायला खूप आवडते. पूर्वी मी मोठ्या रांगोळ्या काढायची आणि लक्ष्मीकांत त्या रांगोळ्यांचे कौतुक करायचा. त्यामुळे माझं रांगोळीविषयीचं प्रेम अजूनच वाढलं, आणि दरवर्षी मनापासून रांगोळी काढते. मात्र आता ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेत काम करत असल्यामुळे वेळ कमी मिळतो, तरीदेखील छोटी तरी रांगोळी दरवर्षी काढतेच”, असेही प्रिया बेर्डेंनी सांगितले.
प्रिया बेर्डेंची पोस्ट
दरम्यान प्रिया बेर्डे यांनी काही दिवसांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. “70वर्ष….आज जन्मदिवस अजूनही तुमचं गारुड लोकांच्या मनावर आहे. एक अभिनेता, चांगला माणूस म्हणून आज ही लोक तुमच्याबद्दल तेवढ्याच उत्साहाने बोलतात. विनोद अनेक रुपाने समोर आला कधी दादागिरीने तर कधी विनोदाचा सम्राट, तर कधी भोळा भाबडा राजा म्हणून पण या महारथींच्या मांदियाळीत या कर्त्याने स्वतःची शैली, स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं. त्यांना कुठलीच पदवी दिली गेली नाही तो कायम सगळ्यांसाठी लक्ष्याच राहिला.. आणि राहणार फक्त ‘लक्ष्या’…”, असे प्रिया बेर्डे यांनी म्हटले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List