‘महाभारता’तील दुर्योधनाचा 36 वर्षांत इतका बदलला लूक; एका घटनेनं बदललं होतं आयुष्य
बी. आर. चोप्रा यांनी 1988 मध्ये ‘महाभारत’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. या मालिकेने आणि त्यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. प्रेक्षक आपापली कामं सोडून टीव्हीसमोर ही मालिका बघण्यासाठी आतूर असायचे. ‘महाभारत’ या मालिकेत अभिनेते पुनीत इस्सार यांनी दुर्योधनाची भूमिका साकारली होती. या मालिकेतून त्यांचा प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र नंतर जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना काम मिळणं कठीण झालं होतं. आता 36 वर्षांनंतर पुनीत यांचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. दुर्योधनाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेले पुनीत इस्सार हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.
पुनीत यांनी ‘महाभारत’ या मालिकेत काम करण्याआधी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’ या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटातील एका ॲक्शन सीनदरम्यान पुनीत यांना अमिताभ बच्चन यांना एक मुक्का मारायचा होता. त्यांनी हा मुक्का इतक्या जोरात मारला होता की बिग बींची हालतच खराब झाली होती. पुनीत यांना हा सीन करणं फार महागात पडलं होतं. त्यानंतर त्यांना काम मिळणंही बंद झालं होतं. बऱ्याच अडचणींनंतर त्यांना ‘महाभारत’ या मालिकेत भूमिका मिळाली होती. या मालिकेनंतर त्यांचं करिअर पुन्हा मार्गावर आलं होतं. त्यांनी साकारलेली दुर्योधनाची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती.
अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता पुनीत इस्सार यांनी मनमोहन देसाई यांच्या 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेतून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका 1988 पासून 1990 पर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यांची दुर्योधनाची भूमिका इतकी गाजली होती की खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना तसंच समजत होते. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ‘महाभारत’ मालिका सुरू असताना एका मारवाडी बिझनेसमनने सर्वांना जेवायला बोलावलं होतं. मात्र त्यावेळी पुनीत यांना जेवणच दिलं गेलं नव्हतं. तुम्ही पांडवांवर इतका अत्याचार का करता, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. इतकंच नव्हे तर मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली या जेव्हा पुनीत यांच्याशी बोलू लागल्या, तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत उभं न राहण्याचाही सल्ला दिला गेला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List