मुख्यमंत्र्यासोबत रात्रभर चर्चेनंतरही गुंता सुटेना, सरवणकर भूमिकेवर ठाम ! माहीममध्ये पुढे काय होणार ?
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यांत अनेक महत्वाच्या लढती पहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माहीम येथील निवडणूक . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवणार असून त्यामुळे तेथे मनसे वि. शिवसेना ठाकरे गट वि. शिवसेना शिंदे गट अशी बिग फाईट पहायला मिळणार आहे. माहीम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे ठरवल्यामुळे सरवणकर यांनी फॉर्म मागे घ्यावा यासाठी त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. मात्र सरवणकर हे अद्याप आपल्या भूमिकेवरच ठाम आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात सुमारे 2 तास चर्चा झाली. सदा सवणकरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पुन्हा एकदा विचार करा असा मुख्यमंत्र्यांनी त्यांना सल्ला दिलाय. युतीधर्म पाळावा लागेल अशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरवणकरांना आठवण करून दिली आहे. मात्र सरवणकर हे आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. मी फॉर्म मागे घेणार नाही असं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याने पेच वाढला.
सरवणकरांना विधान परिषदेची ऑफर ?
सरवणकरांना समजवताना शिंदेंकडून त्यांना विधान परिषदेची ऑफरही देण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सरवणकर किंवा त्यांच्या मुलीला शिवसेनेमार्फत विधान परिषद मिळेल, अशी ऑफरही दिली. येत्या 4 तारखेपर्यंत योग्य तो निर्णय घ्या, उमेदवारी अर्ज घ्या असा अल्टिमेमट शिंदेनी सरवणकरांना दिल्याचं समजतंय. पण माझ्यावर माझ्या मतदारांचा दबाव आहे, कोणत्याही परिस्थितीत माघार घेऊ नये, मतदारांनी मला लढायला सांगितलं आहे. मला तुम्ही आशीर्वाद द्या, या भूमिकेवर सरवणकर ठाम असल्याचं समजतंय. आपली उमेदवारी मागे न घेता ती कायम ठेवण्याच्या निर्णयावर सरवणकर ठाम आहेत. त्यामुळे माहीममधील पेच वाढला असून हा गुंता अद्याप काही सुटलेला नाही.
माहीममध्ये तिहेरी लढत
येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येतील. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी माहीम विधानसभा मतदारसंघाची ओळख असून हा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. यंदा निवडणुकीत मनसेकडून माहीम मतदारसंघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच महाविकासाआघाडीत ठाकरे गटाकडून महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिहेरी लढत रंगणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List