“त्याची चव अप्रतिम असते”, अमिताभ बच्चन यांना आवडतो ‘हा’ चमचमीत मराठमोळा पदार्थ
Amitabh Bachchan’s Favorite Food: बिग बी अमिताभ बच्चन यांचे अनेक किस्से प्रसिद्ध होत असतात. अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगाना उजाळा देत असतात. स्पर्धकांच्या आयुष्यातील प्रसंग ऐकता ऐकता आपल्या संघर्षाच्या काळातील गोष्टीही सांगत असतात. अमिताभ बच्चन अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहतात. अनेक मराठी अभिनेते त्यांचे मित्र आहेत. त्यांच्या घरी येणंजाणंही असतं. अमिताभ बच्चन यांना मराठी पदार्थही खूप आवडतात. त्यात वडापाव म्हटलं की मराठी माणसांचा विक पॉईंट. तुम्हाला माहितीये बिग बींना सुद्धा वडापाव हा अत्यंत आवडतो.
कौन बनेगा करोडपती 16च्या सीजनमध्ये गुजरात येथील एक कला, शिल्प आणि संगीत शिक्षिका हर्षा उपाध्याय सहभागी झाल्या होत्या. त्यांच्याशी अमिताभ बच्चन यांनी खेळादरम्यान खूप गप्पा मारल्या. अमिताभ यांच्याशी यावेळी खाण्यावर चर्चा रंगल्या. तुम्हाला चुरमा आवडतो का? असा सवाल जेव्हा हर्षा यांनी अमिताभ यांना विचारला. त्यावर अमिताभ यांनी हसत हसत उत्तर दिले. भलेही मी सर्व पदार्थांची चव घेतली नसेल पण एक स्नॅक्स मला खूप आवडते. ते म्हणजे वडापाव, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
वडापावसारखा पदार्थच नाही
वडापाव सारखा पदार्थच नाही. त्यापेक्षा चांगला पदार्थ असूच शकत नाही. अत्यंत छोटा आहे, पण अत्यंत भारी आहे. प्रत्येक ठिकाणी वडापाव मिळतो. देशातच नाही तर विदेशातही वडापाव मिळतो, असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
आणि दारू सोडली
अमिताभ यांचा दारू सोडल्याचा किस्साही अधूनमधून व्हायरल होत असतो. अमिताभ बच्चन यांचा सात हिंदुस्तानी हा सिनेमा आला होता. त्यावेळचा हा किस्सा आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी सिनेमाचे निर्माते ख्वाजा अहमद अब्बास हे अत्यंत कमी बजेटमध्ये सिनेमा बनवायचे. जेव्हा ते खूश व्हायचे तेव्हा आपल्यासोबत काम करणाऱ्यांना 50 रुपये देऊन जा मजा करा, असं म्हणायचे. एकदा हे 50 रुपये अमिताभ यांना मिळाले. त्यांनी पार्टी करायचं ठरवलं. जलाल आगा आणि अन्वर अली यांच्यासोबत अमिताभ यांनी पार्टी करण्याचा निर्णय घेतला. तिघेही प्रचंड दारू प्यायले.
दुसऱ्या दिवशी अनवर अली हे अमिताभ यांच्याकडे आले. त्यांनी अमिताभ यांना मोलाचा सल्ला दिला. जोपर्यंत तुझं फिल्म इंडस्ट्रीत नाव होत नाही, तुला लोकप्रियता मिळत नाही, तोपर्यंत दारूला हात लावू नकोस, असं अन्वर अली यांनी अमिताभ यांना सांगितलं. त्या दिवसापासून अमिताभ यांनी दारूला हात न लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आयुष्यभर दारूला हात लावला नाही. फक्त लहान भाऊ अजिताभ यांच्या लग्नाच्यावेळी त्यांनी फक्त दोन घोट घेतल्याचेही सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List