तानाजी सावंत सख्ख्या भावाकडूनही बेदखल; मिंधे गटाच्या मेळाव्याच्या जाहिरातीतून फोटो गायब
धाराशिवचे माजी पालकमंत्री आणि भूम-परंड्याचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांना मिंधे गटाकडून पुन्हा बेदखल केल्याचे दिसत आहे. मिंधे गटाने सोलापूर शहरात मेळावा आयोजित केला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र या मेळाव्याचे होर्डिंग्ज लावण्यात आलेत. मात्र, या सर्व जाहिरातीतून माजी मंत्री तानाजी सावंत यांना बेदखल करण्यात आले आहे. तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनीच या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावरून सावंत यांना पक्षातूनच नव्हे तर कुटुंबातूनही एकटे पाडले जात असल्याचे दिसत आहे.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले सावंत भूम, परांडा, वाशी विधानसभा मतदारसंघावरही प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा एक मुलगा थायलंडला निघून जाताना सरकारने परत फिरवलेले विमान आणि यासंदर्भातील प्रकरणामुळे सावंत पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले होते. पण, त्यांच्या नाराजीचा फटका मतदारसंघाला बसत असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला देखील त्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे त्यांच्यावर मिंधे गट आणि घरातील सदस्य नाराज असल्याची चर्चा होत आहे. सोलापुरात होत असलेल्या मेळाव्याच्या जाहिरातीतून सावंत यांना वगळण्यात आले आहे.
जाहिरातींमध्ये मिंधए गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे, प्रा. शिवाजी सावंत, त्यांचे दोन चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो आहेत. या प्रमुख फोटोंसह सोलापूर जिल्ह्यातील छोट्या मोठ्या 70 पदाधिकाऱ्यांचे फोटो देण्यात आले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री भाजपचे जयकुमार गोरे यांचाही फोटो यामध्ये असताना तानाजी सावंत यांनाच यातून वगळल्यामुळे चर्चा होत आहेत.
आता मिंधे गटातूनच त्यांना बाजूला केल्याने कुटुंबातून देखील त्यांच्या मर्जीशिवाय पक्षाचे जाहीर कार्यक्रम सुरू झाले आहेत. मागील महिन्यात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोहे धाराशिव दौऱ्यावर आल्या असता त्यांच्याही स्वागताच्या होर्डिंग्जवर तानाजी सावंत यांना स्थान देण्यात आले नव्हते. तानाजी सावंत यांना गटातून बेदखल करण्यात आल्याचे दिसून येत होते. आता त्यांच्या भावानेच बेदखल केल्यामुळे याची चर्चा होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List