आणखी एक सौगात-ए-मोदी, मदरशांचा 2 लाखांचा निधी 10 लाख केला
<<< आशीष बनसोडे >>>
वक्फ विधेयक, औरंगजेबाची कबर, नागरिकत्व कायदा अशा माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुस्लिम बांधवांविरुद्ध टोकाची भूमिका घेतली. दुसरीकडे रामनवमीनिमित्त लाखो मुस्लिमांच्या घरी सौगात-ए-मोदी पोहोचवली. आता मदरशांनाही सौगात देऊन आपण मुस्लिमविरोधी नाही अशी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. मदरशांचे अनुदान दोन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये करण्यात आले आहे.
मदरसे बंद करा अशी भूमिका भाजपशासित राज्यांमधील भाजपाचे मंत्री आणि आमदार नेहमीच घेत असतात. मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण दिले जाते, असाही आरोप भाजपकडून केला जातो. दुसरीकडे निवडणुकांच्या तोंडावर मदरशांना मदत करण्याची आश्वासने भाजपकडून दिली गेली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मदरशांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
नरेंद्र मोदी सरकारच्या 15 कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक विकासाच्या नावाखाली राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्यासाठी मदरशांच्या अनुदानाची रक्कम दोन लाखांवरून दहा लाख रुपये केली गेली आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्यातील 500 हून अधिक नोंदणीकृत मदरसे आणि अल्पसंख्याकांच्या शाळांना हे अनुदान देण्यात येत आहे.
अल्पसंख्याक समाजातील गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखून त्यांना मुख्य शिक्षणदेखील दिले जाणार आहे. त्यातून त्यांची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती होण्यास मोठा हातभार लागणार आहे, असे अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
वक्फ बोर्डात नोंदणी असलेल्या मदरशांनाच अनुदान
वक्फ सुधारणा विधेयक मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत मंजूर करून घेतले. या विधेयकानुसार वक्फ बोर्डाच्या ताब्यातील जमिनी आणि मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे. देशातील मदरशांची नोंदणी याच वक्फ बोर्डामध्ये असते. मालमत्ताच ताब्यात घेतली गेली तर मदरशांचेही अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मदरसे बंद करण्याची वेळ येऊ शकते. मग मदरशांचे अनुदान वाढवून मोदी सरकारने नेमके काय साध्य केले हे समजण्याइतका मुस्लिम समाज खुळा नाही, असे मत एका मुस्लिम नेत्याने व्यक्त केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List