दोन भावांचा उद्देश फक्त ‘महाराष्ट्र हित’, आम्ही कोणत्याही अटी-शर्ती टाकलेल्या नाहीत! – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या साद-प्रतिसादामुळे देशाच्या राजकारणात अक्षरश: उलथापालथ झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘ठाकरें’चीच चर्चा सुरू आहे. मात्र काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे ही लोक काटे मारत असतात. दोन भावांचा उद्देश फक्त महाराष्ट्र हित असून आम्ही कोणत्याही अटी-शर्ती टाकलेल्या नाहीत, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताचा विषय मांडला आणि ताबडतोब काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसादही महाराष्ट्र हितासाठी होता. दोन प्रमुख नेते, जे भाऊ आहेत त्यांच्यात महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायची सहमती होतेय तर त्याच्यामध्ये फार वादविवाद करणे योग्य नाही. यात कोणती अट, कोणती शर्त आहे? दोघांचे म्हणणे महाराष्ट्र हित आहे. या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भाजप आणि भाजपसोबत जे लोक आहेत ते बसत नाहीत. ही अट नाही, ही लोकभावना आहे. याला कुणी अटी-शर्ती म्हणत असेल तर त्याने राजकीय अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जीव तोडून काम करायला तयार आहोत. मी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्याबरोबरही काम केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही काम केले आहे. आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करतोय. महाराष्ट्र हित हेच आमचे ध्यय आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान या एका उच्च ध्येयासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्र आणि मराठी माणूस यासाठी सगळ्यांनी एकत्र यावे ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे आता जर मतभेद, वाद हे दूर ठेऊन, मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. यात उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट किंवा शर्त टाकलेली नाही. महाराष्ट्र हिताला प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्र व महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंगतीला बसू नका. यात अट आणि शर्त नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी जे विधान केले त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला, महाराष्ट्रातील गावातील शेवटच्या माणसाला कळेल अशा पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य, जे महाराष्ट्र हिताच्या आड येतील त्याला घरात सुद्धा घेऊ नका आणि घ्यायचे नाही, त्यांच्या पंक्तीलाही बसू नका आणि त्यांचे आगत-स्वागत करू नका. यात चुकीचे काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आमच्या घरात मोरारजी देसाई यांचा फोटो आम्ही अजिबात लावणार नाही. महाराष्ट्राचे शत्रू असलेल्या मोदींचा फोटोही लावणार नाही. हे दोघेही महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकाने महाराष्ट्र लुटला, तर दुसऱ्याने महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या तोडला. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी बाळासाहेबांची शिवसेना तोडली. हे महाराष्ट्राचे शत्रू असून त्यांच्याबरोबर राहणारेही महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांच्याबरोबर राऊन कुणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही एवढी स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे, असेही राऊत म्हणाले.
भांडणे, वाद असतील तर मिटवू; महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावर राज–उद्धव ठाकरे यांची सहमती
पुढले प्रत्येक पाऊल मराठी माणूस आणि महाराष्ट्र हितासाठी टाकले पाहिजे असे आम्ही ठरवले आहे आणि ती भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मनसे प्रमुखांनीही याबाबत भाष्य केल्याने त्याच्यावर वाद कशाला घालता? असा वाद घालणे महाराष्ट्र द्रोह्यांच्या पथ्यावर पडेल. महाराष्ट्र द्रोही कोण हे देखील अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्हाला समजत नसेल तर राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावे लागेल. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र द्रोही कोण हे माहिती आहे. काही लोकांना माहिती नसेल आणि ते या चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण करत असतीत तर ते महाराष्ट्र हिताचे नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List