पुतिन यांच्याकडून यूक्रेनला ईस्टर ब्रेक; ईस्टरच्या सणासाठी केली युद्धबंदीची घोषणा
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आता अमेरिकेनेही शांततेसाठी या दोन्ही देशांमध्ये वाटाघाटांसाठी मध्यस्ती केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये दिलासादायक वृत्त आले आहे. ईस्टर सणाच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहचला असतानाच पुतीन यांच्या या निर्णयाने शांततेसाठी एक पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
युद्धविरामाचा हा निर्णय मानवी सहाय्यता आणि धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे, असे रशियाने म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी रात्री 8.30 वाजल्यापासून ते रविवारीच्या मध्यरात्रीपर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी संपूर्णत:मानवी दृष्टीकोनातून हा निर्णय घेतलेला आहे. गुड फ्रायडे नंतर ईस्टर सण्डे हा धार्मिकदृष्ट्या महत्वाचा सण मानला जात आहे. परंतू हा युद्धविराम काही तासांचा आहे. मात्र, शांततेसाठी या निर्णयाला महत्तव प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वी रशियाने मोठा हल्ला करीत युक्रेनच्या रहिवासी इमारतींना लक्ष्य केले होते. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष शिगेला पोहचला असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. पुतीन यांनी आशा व्यक्त केली आहे की युक्रेनने देखील या पावलाचे स्वागत करुन त्यांच्याकडूनही युद्धविरामाची घोषणा केली पाहीजे. युक्रेनला खरंच शांतता हवी असेल तर त्यालाही रशियासारखे युद्धविरामाची घोषणा करायला हवी. पुतीन म्हणाले की ईस्टर हा केवळ सण नाही तर दयाळूपणा, आणि अस्तित्वाचे प्रतिक आहे. या निमित्ताने युद्धबंदीचा निर्णय असल्याचेही पुतीन यांनी म्हटले आहे.
पुतीन यांनी यावेळी असाही इशारा दिला की जर युक्रेनकडून युद्धबंदीचे उल्लंघन झाले तर रशियन सैन्य तात्काळ कारवाई करेल असेही पुतिन यांनी स्पष्ट केले आहे. पुतीन यांनी आपल्या लष्करी कमांडरना सैन्याला पूर्णपणे सतर्क ठेवण्याचे आणि कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ असा की युद्धबंदी ही एकतर्फी नसते, तर ती परस्पर संमती आणि आदरभाव यांच्यावरच आधारित आहे असेही पुतीन यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List