केंद्र-राज्य ऊर्जा आयोगांत समन्वय नाही! शरद पवार यांनी फटकारले
‘केंद्र सरकारचा ऊर्जा आयोग आणि राज्य ऊर्जा नियामक आयोगात समन्वय नाही. सामाजिक व आर्थिक परिणाम या आयोगांना कळत नाहीत,’ अशा शब्दात ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऊर्जा आयोगांना फटकारले. ‘राष्ट्रीय जैव अभियाना’त साखर कारखान्यांच्या जैववायू आधारित सहवीज प्रकल्पांना पुरेसे स्थान नसणे हेदेखील दुःखदायक असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. साखर कारखान्यांमार्फत वीजनिर्मिती करणाऱ्या ‘को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया ‘तर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात शरद पवार बोलत होते.
देशातील सहवीजनिर्मिती प्रकल्प, उत्तम कामगिरी करणारे अधिकारी आणि सहकारी, तसेच खासगी क्षेत्रातील प्रकल्पांना मिळून एकूण 33 पारितोषिकांचे वितरण यावेळी पवार यांच्यासह राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, महाराष्ट्र सहकारी साखर कारखाने संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील व व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील, प्रतापराव पवार, बारामती येथील ‘अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र पवार, सल्लागार शास्त्रज्ञ संगीता कस्तुरे, केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सौर विभागाचे सहसचिव दिनेश जगदाळे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘जैववायू हादेखील कृषी जैवघटकांतून तयार होतो, हे मान्य करण्याची वेळ आली आहे. साखखर कारखान्यांकडून जैवघटकांच्या आधारे ऊर्जा प्रकल्प चालवून एक प्रकारे बिगर हंगामातदेखील कारखान्यांची क्षमता वापरली जाते आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जैववायू व जैवघटक असा भेद करणे थांबविले पाहिजे.’
‘देशात आता ‘कृत्रिम बुद्धिमता’ (एआय) या नव्या क्षेत्राचा उदय झाला आहे. भारतीय कृषिक्षेत्रातील उपयुक्तता या तंत्रामुळे वाढणार आहे. बारामतीच्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने या क्षेत्रात ओळख तयार केली आहे. ट्रस्टने शेतकऱ्यांच्या मदतीने राबविलेल्या प्रकल्पांमधून ऊसशेतीचा खर्च कमी करून दाखवत मोठी उत्पादकतावाढ होत असल्याचे सिद्ध केले आहे,’ असेही पवार म्हणाले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘एकीकडे साखर कारखान्यांची ऊसगाळपक्षमता वाढत असताना दुसरीकडे उसाची घटती उपलब्धता हे संकट आहे. त्यामुळे ‘एआय’च्या माध्यमातून उसाची उत्पादकता वाढवायला हवी. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम 150 ते 160 दिवस चालला तर उद्योगास तो परवडतो. मात्र, यंदा 90 ते 100 दिवसांवर हंगाम आला असून, उर्वरित महिने कारखान्यांचा खर्च कसा भागवायचा हासुद्धा प्रश्न आहे.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List