फिरस्ती – पद्मदुर्ग! शिवरायांच्या दुर्गशास्त्राचा अनोखा नमुना
>> प्रांजल वाघ, [email protected]
अनेक हल्ले, लढाया यांना तोंड देत मुरुडजवळील बेटावर चार वर्षांत उभा राहिलेला किल्ला पद्मदुर्ग! या किल्ल्याच्या रूपाने शिवाजी महाराजांनी राजपुरीच्या म्हणजे जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजपुरीच निर्माण केली. पश्चिम किनारपट्टी ताब्यात घेणे, व्यापार सुरळीत चालवणे आणि प्रजेला धर्मांध सिद्दीपासून मुक्त करणे या दृष्टिकोनातून पद्मदुर्गाच्या रूपाने सिद्दीच्या ऐन दारात किल्ला उभा करणे म्हणजे सामान्य कार्य नव्हे!
मुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून पाहिले तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठय़ांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर तो अनन्वित अत्याचार करे. बळजबरी धर्मांतर, लोकांना पकडून गुलाम म्हणून विकणे, आया-बहिणींची अब्रू लुटणे, कत्तली यामुळे तिथली प्रजा कंटाळून गेली होती. त्यात जंजिरा किल्ल्यात बसून हा सिद्दी दर्यावर सत्ता गाजवायचा आणि तिथला व्यापार आपल्या ताब्यात ठेवायचा.
पश्चिम किनारपट्टी ताब्यात घेणे, व्यापार सुरळीत चालवणे आणि प्रजेला धर्मांध सिद्दीपासून मुक्त करणे या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड जवळील कासवाच्या आकाराच्या बेटावर पद्मदुर्ग बांधायचा ठरवला. सिद्दीच्या ऐन दारात किल्ला उभा करणे म्हणजे सामान्य कार्य नव्हे. शिवाजी महाराजांनी इ.स. 1675 मध्ये दर्यासारंग दौलतखान याला बेटाची सुरक्षा आणि सुभेदार जिवाजी विनायक यांस रसद पुरवठय़ाची जबाबदारी देऊन तिथे पद्मदुर्ग निर्माण करायला सांगितला. अनेक हल्ले, लढाया यांना तोंड देऊन चार वर्षांत हा किल्ला उभा राहिला. पद्मदुर्ग बांधून शिवाजी महाराजांनी राजपुरीच्या म्हणजे जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजपुरीच निर्माण केली.
मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावरुन आता प्रत्येकी 300 रु दराने बोटी सुटतात. हे तिकीट काढून आपल्याला किल्ल्यात जाता येते. आपली बोट जिथे लागते त्याच्या डाव्या बाजूस पद्मदुर्गाचा परकोट आहे. कमळाच्या पाकळ्याच्या आकाराच्या चऱ्या असलेला खणखणीत बुरुज आपल्या नजरेस पडतो. किल्ल्याच्या तटबंदीचे दगड शतकानुशतके समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत करत झिजले आहेत. पण त्या दगडांमध्ये वापरलेला चुना आज ही शाबूत आहे. शिवरायांची दुर्गबांधणी किती उच्च दर्जाची होती याचा इथे प्रत्यय येतो. परकोटाच्या आत ‘कोटेश्वरी आई’चे छोटेखानी मंदिर, पाण्याचा हौद, अनेक तोफा आणि काही इमारतींचे अवशेष आहेत. दुर्लक्षित असल्यामुळे इथल्या भिंती अक्षरश शेवटच्या घटका मोजत आहेत.
मुख्य किल्ल्याला दोन महाद्वार आहेत. इथली सगळी तटबंदी अजूनही शाबूत आहे आणि 7 भक्कम बुरुज आजही पहारा देत उभे आहेत. किल्ल्यात पाण्याची टाकी, पहारेकऱ्याच्या देवडय़ा, तटात असलेले शौचालय असे अनेक अवशेष आपल्या नजरेस पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, संभाजी महाराजांच्या काळात पण पद्मदुर्ग मराठय़ांकडे होता. साधारण 1698-99 च्या आसपास सिद्दीने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु हा किल्ला स्वराज्यात आला नाही. हा किल्ला शेवटी मराठय़ांकडे आला की नाही हे फक्त सर्वभक्षी काळच सांगेल.
बोटीत बसून परत निघताना दूर दक्षिणेस सिद्दीचा जंजिरा दिसतो. जवळच डोंगरावर शिवरायांनी बांधलेला सामराजगड आपल्या नजरेस पडतो. अलिबाग किंवा मुरुडला गेलात तर मुद्दाम पद्मदुर्गाला भेट द्या. शिवरायांच्या दुर्गशास्त्राचा एक अनोखा नमुना म्हणून त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List