रोखठोक – भारतीय गाढवांचे ’ब्रेन मॅपिंग’?
अमेरिकेचे प्रे. ट्रम्प यांचा वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध झाला. ट्रम्प यांचे ’ब्रेन मॅपिंग’ म्हणजे मेंदू चाचणीही झाली व ते काम करण्यास सक्षम आहेत असे सांगितले. ‘ब्रेन मॅपिंग’ निकालात ईव्हीएमप्रमाणे गडबड तर नाही ना? अशी शंका अनेकांना वाटते. भारतातील राज्यकर्त्यांचे असे ’ब्रेन मॅपिंग’ शक्य आहे काय?
प्रे. ट्रम्प हे अमेरिकेसारख्या राष्ट्राचे नेतृत्व करण्यास मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत काय? अशी शंका जगभरात अनेकांना पडली होती. ट्रम्प हे वेड्यासारखे वागतात व लहरी माणसाप्रमाणे निर्णय घेतात. त्यामुळे ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर आहे काय? असे त्यांच्या समर्थकांनाही वाटू लागले. आता ‘व्हाईट हाऊस’कडून प्रे. ट्रम्प यांचा वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ते त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले. ट्रम्प यांनी 11 एप्रिल रोजी मेरीलाण्ड वाल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर येथे त्यांच्या मेंदूची आणि हृदयाची तपासणी केली. त्यात त्यांचा मेंदू आणि हृदय चांगले असल्याचे सांगितले. त्यांची मानसिक चाचणी झाली. त्यातही ते ठणठणीत निघाले. प्रे. ट्रम्प हे 78 वर्षांचे आहेत व त्यांच्या प्रकृतीविषयी वारंवार चर्चा सुरू असतात. ट्रम्प यांच्या मेंदूत काहीच कचरा नाही. तरीही ते असे का वागत आहेत? ईव्हीएममध्ये घोटाळा करून निर्णय बदलला जातो तसे काही प्रे. ट्रम्प यांच्या मेंदू चाचणीबाबत घडले आहे काय? ट्रम्प हे या प्रकारचे एकमेव राष्ट्राध्यक्ष किंवा नेते नाहीत. भारतासह जगातील अनेक देशांतील राज्यकर्त्यांची मेंदू चाचणी करणे आवश्यक आहे, पण या चाचण्या खऱ्या असतील काय?
भारतातही वैद्यकीय चाचण्या
प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक केला तसा भारतातील राज्यकर्त्यांचा वैद्यकीय अहवालही सार्वजनिक करायला हवा. पंतप्रधान मोदी यांच्या आरोग्याविषयी तर त्यांच्या चाहत्यांनाही चिंता वाटावी अशी वक्तव्ये ते करत आहेत. खरेखोटे याचे भान त्यांना अजिबात नाही. वक्फ सुधारणा बिल मंजूर केल्यानंतर मोदी हे स्वत:ला 11 कोटी गोरगरीब मुसलमानांचे मसीहा समजू लागले आहेत. “काँग्रेसने मुसलमानांसाठी काहीच केले नाही. जे केले ते मीच केले,” असे ते म्हणतात. मोदी हे हरयाणातील हिस्सार येथे गेले व त्यांचे मुस्लिम प्रेम उफाळून आले. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाला मनापासून मुस्लिमांबद्दल प्रेम असेल तर त्यांनी एका मुस्लिमाला त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष का केले नाही?” मोदी यांचा हा प्रश्न त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाटावा असा आहे. मुस्लिमांचे भले व्हावे असे काँग्रेसला कधीच वाटले नाही असे मोदी म्हणाले, पण काँग्रेसचे राजकारण हे मुस्लिम भल्याचे आहे असे मोदी गेल्या 15 वर्षांपासून सतत बोलत आहेत. काँग्रेसला मुस्लिमांविषयी प्रेम आहे तर मग काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का नेमला नाही? अशी चिंता पंतप्रधान मोदी व्यक्त करतात. त्यांची ही चिंतादेखील त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटावी अशीच आहे. एकतर मोदी यांनी इतिहासाचे धडे घेणे गरजेचे आहे किंवा प्रे. ट्रम्पप्रमाणे ‘मेंदू चाचणी’ करून त्याचा अहवाल सार्वजनिक करणे आवश्यक आहे. मोदी हे खऱ्या इतिहासात डोकावले असते तर त्यांना काँग्रेसने केलेले मुस्लिम अध्यक्ष दिसले असते.
- बद्रुद्दीन तय्यबजी
- रहिमतुल्ला मोहम्मद सयानी
- नवाब सय्यद मुहम्मद बहाद्दूर
- सय्यद हसन इमाम
- हकीम अजमल खान
- मोहमद अली जौहर
- मौ. अब्दुल कलाम आजाद (दोन वेळा)
- मुख्तार अहमद अन्सारी
काँग्रेसने त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी हे सर्व मुस्लिम नेमले तसे देशाच्या राष्ट्रपतीपदावरही मुस्लिम व्यक्तींची निवड केली. अनेक राज्यपाल मुसलमान नेमले व मुख्यमंत्रीही केले. महाराष्ट्रासारख्या राज्यात बॅ. ए. आर. अंतुले यांना मुख्यमंत्री केले. त्याच अंतुले यांनी कुलाब्याचे नाव ’रायगड’ केले. इंग्लंडमधील भवानी तलवार भारतात आणायची प्रेरणा त्यांचीच. आज मुसलमानांची चिंता वाहणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात एकही मुसलमान प्रतिनिधी दिसत नाही. ज्या देशात मुसलमानांची लोकसंख्या 20 ते 22 कोटी आहे, त्या समाजाला देशाच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसावे व पंतप्रधान मोदी यांनी आपणच मुसलमानांचे तारणहार असल्याचे बोलावे, हे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाटावी असे लक्षण आहे.
खोटे बोलण्याचा आजार
प्रश्न मुसलमानांविषयी वाटणाऱ्या खोट्या तळमळीचा नाही, तर खोटे बोलण्याचा, भ्रम निर्माण करण्याचा जो आजार पंतप्रधानांना जडला आहे त्याचा आहे. मोदी हे एका बाजूला मुसलमान समाजाविषयी चिंता व्यक्त करतात, तेथे दुसऱ्या बाजूला भाजपच्या हिंदुत्वाचे मुख्य प्रचारक बाबा रामदेव हे त्यांच्या पतंजली उद्योगाची उत्पादने संपविण्यासाठी मुसलमानांवर रोज हल्ले करीत आहेत. रामदेव यांनी एक नवे सरबत बाजारात आणले व ते हिंदूंचे सरबत असल्याचे सांगितले. बाजारात अनेक पिढ्यांपासून लोकप्रिय असलेले ‘रुह अफजा’ हे हमदर्द कंपनीचे सरबत विकत घ्याल तर तुमचे पैसे जिहादसाठी वापरले जातील, असा एक ‘शरबत जिहाद’ बाबा रामदेव यांनी आणला. तो मुसलमानांचे मसीहा पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का? मोदी यांचा डाव सरळ नाही. मोदी यांनी मुस्लिम प्रेम दाखवायला सुरुवात केली आहे ती काँग्रेसला सापळ्यात अडकविण्यासाठी. मोदी यांचे मुस्लिम प्रेम पाहून काँग्रेस त्यांच्या मुस्लिम प्रेमाची ‘मात्रा’ वाढवेल आणि त्यानंतर मोदी व भाजप काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमावर हल्ले सुरू करून हिंदूंच्या मनात रोष निर्माण करतील.
रुपया कसा कोसळला…
मोदी यांच्या अंधभक्तांशी वाद घालणे म्हणजे ‘गाढवांशी’ वाद घालण्यासारखे आहे. लोकांना मूर्ख बनवण्याचे रोज नवनवे फंडे मोदी शोधत असतात. लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवणे शक्य नाही हे मोदी यांनी खोटे ठरवले आहे. मोदींची जुनी भाषणे ऐकायला हवीत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सांगत, “देशात जर मजबूत पंतप्रधान असता तर भारताचा रुपया इतका कधीच कोसळला नसता.” तेव्हा वाटायचे कधी एकदा हा माणूस आपला पंतप्रधान होतोय आणि रुपया मजबूत होईल, पण मोदी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून रुपया रोज कोसळतोच आहे. त्यावर मोदी एका शब्दाने चिंता व्यक्त करायला तयार नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी भाषणे देत फिरत होते, “मी मरण पत्करेन, पण आधार योजना लागू होऊ देणार नाही.” मोदींनी पंतप्रधान झाल्यावर आधार योजना अधिक जोरात लागू केली व त्यांनी पुन्हा मरण्याची भाषा केली नाही. जिवंतपणीच खोटेपणाला प्रतिष्ठा दिली. मोदी व त्यांचे लोक रोज खोटे बोलतात. रुपया घसरतो आहे, पण खोटे-असत्याचे मूल्य डालर्सच्या वर गेले आहे. या आजारावर इलाज काय? प्रे. ट्रम्पप्रमाणे आता कोणाच्या मेंदूची तपासणी करावी?
गाढवांशी वाद
मोदी यांनी लोकांना मूर्ख बनविण्याचे दुकान काढले आहे व राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’शी त्यांनी स्पर्धा लावली आहे. हरयाणातील हिस्सारमध्ये एक रामपाल कश्यप नावाचे पात्र सापडले. त्याने 14 वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की, “जोपर्यंत मोदी पंतप्रधान होत नाहीत, मी त्यांना भेटत नाही, तोपर्यंत मी बूट घालणार नाही.” मोदी हिस्सारला गेले व आपल्या हाताने कश्यपच्या पायात बूट घातले. मोदी यांनी अशा अनेक महान कार्यांत स्वत:ला झोकून दिले. यावर वाद घालणे हा मूर्खपणा आहे. एक गाढव आणि वाघाचा जंगलात वाद सुरू झाला. वाघाचे म्हणणे होते, “गवत हिरवे आहे.” गाढव म्हणाले, “छे, तू मूर्ख आहेस. गवत तर निळे आहे.” वाघ मानायला तयार नव्हता. “गवत हिरवेच आहे.” असे वाघ डरकाळ्या फोडून सांगू लागला. गाढवही खिदळू लागले. शेवटी दोघांत ठरले. जंगलचा राजा ‘सिंह’ महाराजांकडे जाऊ. तोच न्याय करेल. दोघे जंगलच्या राजाकडे गेले. राजाने विचारले, “काय फिर्याद आहे?” गाढवाने सुरुवात केली, “महाराज, हा वाघोबा म्हणतोय, गवत हिरवे आहे. मी म्हणतोय, गवत निळे आहे, पण हा मानायला तयार नाही. आता तुम्हीच या मूर्खाला सांगा.” सिंहाने आपली आयाळ हलवली व म्हणाला, “गाढवा, तुझे म्हणणे शत प्रतिशत खरे आहे. भाजपप्रमाणे; गवत निळेच आहे.” यावर गाढव खूश झाले. वाघाला म्हणाले, “बघ, निकाल माझ्या बाजूने लागला.” गाढव त्यानंतर नाचत, उड्या मारत बाहेर पडले, पण ते परत थांबले. त्याच्या डोक्यात आले, मी खटला तर जिंकला, पण या वाघाने माझा ‘टाइम’ खाल्ला त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. ते पुन्हा सिंहाच्या दरबारात आले. “महाराज, तुम्ही न्याय माझ्या बाजूने केलात, पण या वाघाला दंड ठोठावायला हवा. कठोर शिक्षा द्यायला हवी.” सिंह म्हणाला, “हो, एकदम बरोबर! वाघा, तुला शिक्षा मिळायलाच हवी. पुढचे दहा दिवस तू मौन बाळगायचे. डरकाळ्या, गुरगुरणे वगैरे बंद.” वाघ म्हणाला, “महाराज, तुमची आज्ञा मान्य.” आता तर गाढव आनंदाने बेफाम झाले. मी या वाघाला धडा शिकवला, शिक्षा दिली. आणखी काय हवे? गाढव निघून गेले आणि वाघाने गुरगुरत सिंहाला विचारले, “अरे, तू कसला राजा आहेस? तुला माहीत आहे, गवत हिरवे आहे. मला माहीत आहे, गवत हिरवेच आहे. जगाला माहीत आहे, गवत हिरवे आहे. मग तू हे का सांगितलेस की, गवत निळे आहे?” सिंह यावर म्हणाला, “हे बघ, शांतपणे ऐक. तुला माहीत आहे, गवत हिरवे आहे. मलाही माहीत आहे, गवत हिरवेच आहे. जगालाही माहीत आहे, गवत हिरवे आहे, पण तू त्या गाढवाबरोबर वाद का करत होतास? तुला त्याचीच शिक्षा ठोठावली की, तू एका गाढवाशी वाद करीत होतास. जो गाढवाबरोबर वाद करतो तो सगळ्यात मोठा गाढव असतो. समजलं?”
गाढवांच्या मेंदूची चाचणी शक्य आहे काय? गाढवांच्या ‘ब्रेन मॅपिंग’ची व्यवस्था भारतातील रुग्णालयांत आहे काय?
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List