एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा शिवसेना टेकओव्हर का केली नाही? राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला
महेश मांजरेकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युती संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान याच मुलाखतीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात देखील एक प्रश्न विचारण्यात आला होता. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं तेव्हा तुम्ही शिवसेना टेकओव्हर करायला हवी होती? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, ‘मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही. मुळात शिंदे बाहेर जाणं, शिंदे फुटणं आणि आमदारांना घेऊन जाणं हा एक वेगळ्या राजकारणाचा भाग झाला.
मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे पण आमदार आणि खासदार तेव्हा आले होते. मलाही त्यावेळी हे सर्व करणं शक्य होतं . पण मनात एकच होतं की, बाळासाहेब सोडून कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मी बाहेर पडलो तेव्हाचा हा विचार होता. पण शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव होते. उद्धव सोबत काम करायला माझी काही हरकत नव्हती. पण समोरच्याची इच्छा आहे का ? मी छोट्या छोट्या गोष्टीत माझा इगो मधे आणत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. तो एकत्र यायला लागला तर त्याला जातीत विभागलं जातं. तो एकत्र येणारच नाही हे बघितलं जातं. महाराष्ट्राच्या बाबतीत हे षडयंत्र सुरू आहे, असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List