राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..
आता पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. एका मुलाखतीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना असा प्रश्न विचारण्यात आला होता, भविष्यात तुमची उद्धव ठाकरेंसोबत युती होऊ शकते का? त्यावर बोलताना “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याला आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
महाराष्ट्र राज्यापेक्षा आम्ही मोठे नाही याचा अर्थ भाजप राज्याचं नुकसान करत आहे हे स्पष्ट आहे. राज्यातून अनेक उद्योग बाहेर जात आहेत, भाजप नुकसान करत आहे. महायुती राज्याच्या मुळावर उठली आहे, असा त्यामागचा अर्थ आहे. भाजप महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे, भाजप महाराष्ट्राला संस्कृती आणि भाषेपासून तोडत आहे, राज ठाकरेंची भूमिका म्हणजे इशारा आहे. राज ठाकरे यांचा भाजपने भ्रमनिरास केला आहे. दोन परिवार एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला तर विचार करू, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
त्यांची भूमिका काँग्रेसला पूरक आहे. हिंदी भाषा सक्तीच्या आम्ही देखील विरोधात आहोत. मराठी भाषेची गळचेपी होत आहे. हिंदी भाषा सक्तीची का केली जात आहे? हे सगळं भाजपचं कारस्थान आहे . भाजप द्वेष पसरवत आहे. हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असे भाजपला करायचं आहे, असा आरोपही यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List