जैन मंदिरावरील कारवाईविरोधात मोठं आंदोलन, मागण्या काय?; मंगलप्रभात लोढा आणि अळवणीही रॅलीत
विलेपार्ले पूर्वेकडील दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली आहे. महापालिकेने हे मंदिर अनधिकृत ठरवले होते. त्यामुळे स्थानिकांनी कोर्टात धाव घेतली होती. यावर उच्च न्यायालयाने 16 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली होती. तसेच कारवाईला स्थगिती आदेशही दिला होता. त्यानंतरही महापालिकेने ही कारवाई केली आहे. त्यामुळे जैन समाजात संतापाची लाट पसरली आहे. जैन समाजाने या कारवाईच्या विरोधात विलेपार्ले परिसरात अहिंसक रॅली सुरू केली आहे. या रॅलीत राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार पराग अळवणी थोड्याच वेळात उपस्थित राहत आहेत. जैन बांधवांनी आधी आरती केली. त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली आहे.
हायकोर्टाने तोडक कारवाईला स्थगिती दिल्यानंतरही महापालिकेच्या के ईस्ट वॉर्डचे अधिकारी नवनाथ घाडगे यांनी मनमानी आदेश देऊन ही कारवाई केली होती. पोलीस बंदोबस्तात दिगंबर जैन मंदिर जेसीबीच्या सहाय्याने फक्त काही मिनिटांत जमीनदोस्त करण्यात आले. 16 एप्रिल रोजी सकाळी 8:00 वाजता कोर्ट सुरू होण्यापूर्वीच मंदिर जमीनदोस्त करण्यात आले होते.
लोढा काय म्हणाले?
मंदिरावर झालेल्या कारवाई विरोधात गुरुवारी रात्री जैन समाजाने एका सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. मंदिर तोडण्याच्या कारवाईमागे आर के हॉटेलचा हात असल्याचा आऱोप स्थानिकांनी आणि इतर वक्त्यांनी केला होता. तसेच या संबंधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी लोढा यांच्याकडे केली होती. संपूर्ण मुंबईतील अहिंसक समाजाने एकत्र यायचं आहे. अहिंसक आंदोलन करायचं आहे. सर्वांनी आपला निषेध नोंदवायचा आहे, असं लोढा म्हणाले होते.
असा असेल मार्ग
विलेपार्ले पूर्व येथील रेल्वे स्थानकासमोरच्या कांबळीवाडीतून या रॅलीला सुरुवात झाली आहे. कांबळीवाडीतून ही रॅली निघाली असून नेहरू रोड, आरके हॉटेल, तेजपाल रोड, हनुमान रोड, महात्मा गांधी रोड, साहजी राणे रोड, कोलडोंगरी, अंधेरी वेस्ट स्टेशन, अंधेरी कुर्ला रोड आणि महापालिका के वॉर्ड ऑफिसला ही रॅली येणार आहे. यावेळी वॉर्ड ऑफिसरला मागण्यांचे निवेदन दिलं जाणार आहे. या रॅलीत मंगल प्रभात लोढा, वर्षा गायकवाड, पराग अळवणी सामिल होणार आहेत. तर रॅलीत सर्व जैन समाज ट्रस्टी आणि संस्था सहभागी झाल्या आहेत.
मागण्या काय?
1) जबाबदार महापालिका अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा
2) महापालिकेने स्वतःच्या खर्चाने नवीन मंदिर त्वरित बांधून द्यावे.
3) या घटनेबद्दल महापालिकेने सार्वजनिक माफी मागावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List