वडगावशेरीत पाणीप्रश्न पेटला; सर्वपक्षीय नेत्यांचे आंदोलन
गेल्या महिनाभरापासून वडगावशेरीतील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच चार-पाच दिवसांपासून भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधील केबल जळाल्याने वडगावशेरी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र, या संकटातही पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकर पुरविणाऱ्या टँकर ठेकेदारांनी नागरिकांनाही आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरल्याचे समोर आले आहे. या सर्व गदारोळामुळे वडगावशेरीतील सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान माजी नगरसेवक संदीप जहऱ्हाड, माजी नगरसेविका सुनीता गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, नारायण गलांडे, श्रीधर गलांडे, माऊली कळमकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधील केबल जळाल्याने पूर्व पुण्यातील पाणीपुरवठ्याला फटका बसला. अचानक पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर दुपारनंतर या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला होता. भामा आसखेड धरणातून उचलले जाणारे पाणी वडगावशेरी, संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ, विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडीचा काही भाग, नगर रस्ता परिसरात पुरवले जाते. बुधवारी दुपारी भामा आसखेडच्या जॅकवेलमधील केबल जळाल्याने पंपिंग यंत्रणा बंद पडली. त्यामुळे सुमारे 10 तास जॅकवेल बंद राहिले. त्यामुळे या जॅकवेलवर अवलंबून असलेल्या परिसरात दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकला नाही, असे कारण दिले आहे. मात्र, महिनाभरापासून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, भामा आसखेड जॅकवेलमधील केबल जळाल्याने यावर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या ठिकाणी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.
खासगी टँकरचालकांनी विनंती धुडकावली
वडगावशेरी भागातील टँकरचा माफियाराज नेहमीच चर्चेत असतो. येथील पंपिंग स्टेशनवर ठेकेदारांनी पाणी चोरीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. आता वडगावशेरीसह परिसरातील पाणी संकटात खासगी टँकरचालकांनी असहकार्याची भूमिका घेतली आहे. अधिकाऱ्यांची विनंती धुडकावून लावत या ठेकेदारांनी चक्क टँकर बंद करून निघून जाण्याचा गंभीर प्रकार घडला
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List