महिला दिनानिमित्त एमपॉवरचा धक्कादायक अहवाल, मुंबईकर महिला ‘या’ कारणामुळे तणावग्रस्त
महिलांचे मानसिक आरोग्य गंभीर संकटात आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीनुसार, भारतात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ३६.६ टक्के आहे. यात १८-३९ वयोगटातील तरुण महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. समाजात मानसिक आरोग्याबाबत असलेल्या भीती आणि कलंकामुळे महिला मदत घेण्यास टाळाटाळ करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम असलेल्या एमपॉवरने ‘अनव्हीलिंग द सायलेंट स्ट्रगल’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल देशभरातील १३ लाख महिलांच्या मानसिक आरोग्य आकडेवारीवर आधारित आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थिनी, कॉर्पोरेट व्यावसायिक, ग्रामीण महिला आणि सैन्यात कार्यरत महिलांच्या मानसिक आरोग्यावर भाष्य करण्यात आलं आहे.
मुंबईतील प्रमुख मानसिक आरोग्य समस्या
एमपॉवर द सेंटरच्या प्रमुख आणि वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हर्षिदा भंसाळी यांनी सांगितले, “महिला नातेसंबंधातील ताण, एकाकीपणा, पालकत्वातील आव्हाने आणि आर्थिक अस्थिरता यांसारख्या समस्यांशी झगडत आहेत. विशेषत: एकट्या माता, विशेष गरजा असलेल्या मुलांच्या आई आणि हार्मोनल असंतुलनाने ग्रस्त झालेल्या महिला मानसिक दबावाखाली आहेत.”
मुख्य निष्कर्ष काय?
यात ५० टक्के महिला कामाचे-आयुष्याचे संतुलन, आर्थिक दबाव आणि सामाजिक अपेक्षांमुळे तणावाखाली आहेत. तर ४७ टक्के महिलांना झोप न येण्याची समस्या आहे. विशेषतः १८-३५ वयोगटातील महिलांचा यात समावेश आहे. तसेच ४१ टक्के महिलांना भावनिकदृष्ट्या एकाकीपणा जाणवत आहेत. त्यासोबतच ३८ टक्के विद्यार्थिनी आणि नोकरदार महिला करिअरची वाढ आणि आर्थिक स्थिरतेबद्दल चिंतेत आहेत.
ग्रामीण महिलांचे मानसिक आरोग्याबद्दलची माहिती
महाराष्ट्र शासनासोबतच्या ‘प्रोजेक्ट संवेदना’ अंतर्गत १२.८ लाख ग्रामीण महिलांवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात असे दिसून आले की, आर्थिक अस्थिरता, सामाजिक कलंक आणि मानसिक आरोग्य सेवांच्या कमतरतेमुळे त्या गंभीर नैराश्य आणि चिंतेने ग्रस्त आहेत. तसेच ४२ टक्के महिलांमध्ये नैराश्य आणि चिंता यांची लक्षणे आढळली. त्यासोबतच ८० टक्के महिलांना मातृत्व रजा आणि करिअरच्या वाढीमध्ये भेदभाव सहन करावा लागतो. तर ९० टक्के महिलांचे म्हणणे आहे की, मानसिक आरोग्य समस्यांचा त्यांच्या कामाच्या कामगिरीवर परिणाम होतो.
PTSD आणि मानसिक आघाताच्या घटनांमध्ये वाढ दिसून आली. अनेक महिला करिअरवर परिणाम होऊ नये म्हणून मानसिक आरोग्य समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलण्यास भीती वाटते. लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि कामाचे-आयुष्याचे संतुलन ही मोठी आव्हाने आहेत. त्यासोबतच मुंबईसारख्या शहरांमध्ये १८ ते २५ वयोगटातील महिलांमध्ये शैक्षणिक ताण आणि कॉर्पोरेट ताण जास्त आहे. तर दिल्लीत सुरक्षिततेच्या चिंता आणि छळामुळे महिला चिंतेत आहेत.
महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशी
- मानसिक आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये समाविष्ट केल्या जाव्यात.
- शासनाने मानसिक आरोग्याला महिलांच्या सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग बनवावा.
- गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान मानसिक आरोग्य तपासणी अनिवार्य करावी.
- कार्यस्थळांवर मानसिक आरोग्य सहाय्य कार्यक्रम लागू करावेत.
- महिलांसाठी गोपनीय आणि सहज उपलब्ध मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात.
- मुलींना लहान वयापासूनच मानसिक आरोग्य शिक्षण द्यावे.
- महिलांना घरात आणि समाजात मानसिक आरोग्यावर मोकळेपणाने बोलण्याची संधी मिळावी.
- माध्यमांद्वारे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List