नेपाळ ट्रिपदरम्यान मंदिरात एकत्र पूजा नाही, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिले..; गोविंदा-सुनिता यांच्यात दुरावा कायम?
लग्नाच्या 37 वर्षांनंतर अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सुनिताने सहा महिन्यांपूर्वीच गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, असा खुलासा अभिनेत्याच्या वकिलाने केला. मात्र त्यानंतर दोघांकडून मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही वकिलाने म्हटलंय. मात्र यानंतर गोविंदा आणि सुनिताच्या नात्यात बरीच कटुता आल्याचा पुन्हा एकदा खुलासा झाला आहे. गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी सांगितलं होतं की, नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व कुटुंबीय नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते आणि तिथे गोविंदा-सुनिताने एकत्र पूजा केली होती. मात्र हे खोट असल्याचं वृत्त ‘बॉम्बे टाइम्स’ने दिलं आहे.
गोविंदा-सुनिता यांच्या एका जवळच्या व्यक्तीने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “सुनिता अहुजा तिची मुलगी टिनासोबत नेपाळला गेली होती. तिथे गोविंदासुद्धा वकील ललित बिंदल यांच्यासोबत पोहोचला होता. मात्र गोविंदा तिथे येईल याची सुनिताला काहीच कल्पना नव्हती. मंदिरात जेव्हा दोघं एकमेकांसमोर आले, तेव्हा तिला समजलं होतं. सुनिता आणि टिना नेपाळला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोविंदा तिथे रवाना झाला होता. इतकंच नव्हे तर दोघं वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिले होते. त्यामुळे दोघांनी एकत्र मंदिरात पूजा केल्याचा दावा खोटा आहे.”
गोविंदा आणि सुनिता यांनी 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं होतं. या दोघांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत. बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात झाल्यानंतर गोविंदाने सुनिताशी गुपचूप लग्न केलं होतं. कोणाला याची कानोकान खबर लागू दिली नव्हती. मात्र सुनिताला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या लग्नाबद्दलच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता लग्नाच्या 37 वर्षांनंतर या दोघांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय. विविध मुलाखतींमध्ये सुनितासुद्धा गोविंदाबद्दल स्पष्ट व्यक्त झाली होती. आम्ही दोघं वेगवेगळ्या घरात राहतोय, असाही खुलासा सुनिताने केला होता. 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर असल्याने सुनिताने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List