हेडफोन्सचा अतिवापर बहिरे करू शकतो, आरोग्य मंत्रालयाचा पत्राद्वारे गंभीर इशारा
सोशल मीडियाच्या या जगात तासन्तास इअरफोन आणि हेडफोन्स वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र सतत इअरफोन आणि हेडफोन वापरणाऱ्या लोकांना आरोग्य मंत्रालयाने काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सततच्या वापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होईल आणि लवकरच बहिरेपणा येऊ शकतो, असा इशारा देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना याबाबत पत्र जारी केले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्ये व वैद्यकीय महाविद्यालयांना इअरफोन आणि हेडफोनच्या दीर्घकालीन वापराविरुद्ध जागरूकता पसरवण्यास सांगितले आहे. मुलांसाठी स्क्रीन टाइम मर्यादित असावा असे सांगताना आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस) डॉ. अतुल गोयल म्हणाले की, मोबाईल फोनच्या सततच्या वापरामुळे मेंदूच्या संज्ञानात्मक विकासावर परिणाम होऊ शकतो. लोकांनी 50 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेल्या ऑडिओ उपकरणांचा वापर करू नये. शक्य असल्यास कमी आवाजाचे हेडफोन वापरा. सोशल मीडियाचा वापर कमी करायला हवा. ऑनलाइन गेमिंगच्या संपर्कात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये कमाल आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त नसेल, याची राज्य सरकारने खात्री करायला पाहिजे.
नैराश्य येऊ शकते
इअरफोन आणि हेडफोन्सचा सतत वापर केल्याने ऐकण्याच्या समस्या उद्भवू शकतात. इअरफोन आणि हेडफोन्स जास्त काळ वापरण्याच्या प्रक्रियेमुळे नैराश्य येऊ शकते, असा इशारा डीजीएचएसने दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List