भोसरी पोलीस ठाण्यात निघाली अडीच टन रद्दी, पोलिसांकडून 46 वर्षांची अडगळ साफ
स्वच्छता मोहिमेअंतर्गत भोसरी पोलीस ठाण्याने तब्बल अडीच टन कालबाह्य कागदपत्रे नष्ट करत 46 वर्षांची अडगळ साफ केली. नागरी सेवा सुधारण्यासाठी आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी सात कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
भोसरी पोलीस ठाण्यामध्ये 1978 पासून पडून असलेल्या कालबाह्य फाईली, कागदपत्र अशा अनावश्यक कागदपत्रांची नोंदणी आणि वर्गीकरण करून सफाई मोहीम राबविली. अडीच टन रद्दीसह इतर अडगळ हटवल्याने परिसर स्वच्छ झाला.
बेवारस वाहनांची लावणार विल्हेवाट
भोसरी पोलीस ठाण्यात 295 दुचाकी आणि 21 चारचाकी वाहने अस्ताव्यस्त स्थितीत पडून होती. त्यांची तपासणी करून त्यांचे लिलावाद्वारे व्यवस्थापन केले जाणार आहे. तसेच 8 लाख 46 हजार रुपये किमतीचा जप्त गुटखा आणि 1 लाख 96 हजार रुपये किमतीची अवैध दारू न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस निरीक्षक भारत शिंदे, सचिन शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ टपरे, फौजदार श्रीकांत गुरव, अमित लबडे, सुहास खाडे, पोलीस शिपाई विकास मोरे, सचिन माने यांनी ही कामगिरी केली.
अडगळ हटविल्याचे सकारात्मक बदल
- पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण.
- पोलीस कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी अधिक चांगले आणि नीटनेटके वातावरण.
- दस्तऐवज व्यवस्थापन सुधारल्यामुळे गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेला वेग.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List