अखेर सुनिता-गोविंदा घटस्फोट घेणार? गोविंदाच्या वकिलाकडून मोठं सिक्रेट ओपन
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. सर्वत्र त्याच्या घटस्फोटाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून या जोडीमध्ये वाद सुरु असल्याची चर्चा होती. एवढंच नाही तर सुनिता मुलांना घेऊन गोविंदापासून वेगळी राहत असल्याचं उघड झाल्याने देखील त्यांच्यातील वाद हा स्पष्ट होत होता. त्यात आता त्यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र अद्याप तरी या दोघांनी यावर कोणतही भाष्य केलेलं नाही.
गोविंदाच्या वकिलाने केला गौप्यस्फोट
मात्र, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाच्या वकिलाने एक गौप्यस्फोट केला आहे. त्याने म्हटल्याप्रमाणे सुनिताने सहा महिन्यांपूर्वी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.पण सध्या दोघेही एकत्र आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वकील आणि गोविंदाचा कौटुंबिक मित्र असणाऱ्या ललित बिंदाल यांने एका मुलाखतीत हे सांगितलं आहे. सुनिताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला, मात्र नंतर गोष्टी सुरळीत झाल्या आणि आता ते एकत्र असल्याचं ललितने म्हटलं.
“त्यांचं नातं भक्कम असून…”
एवढंच नाही तर नववर्षाच्या निमित्ताने ते सर्व एकत्र नेपाळलाही गेले होते. तसेच पशुपतीनाथ मंदिरात त्यांनी पूजा केली होती. दोघांमध्ये सध्या सगळं काही सुरळीत आहे. जोडप्यांमध्ये अशा गोष्टी होत असतात, पण आता त्यांचं नातं भक्कम असून, दोघे एकत्र आहेत असल्याचंही ललितने म्हटलं.
कार्यालयीन वापरासाठी बंगला खरेदी केला
ललित बिंदाल यांनी गोविंदा आणि पत्नी सुनिता वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहत असल्याच्या चर्चाही फेटाळल्या आहेत. गोविंदाने खासदार झाल्यानंतर कार्यालयीन वापरासाठी बंगला खरेदी केला होता. हा बंगला तो लग्नानंतर वास्तव्यास असलेल्या फ्लॅटच्या अगदी समोरच आहे. गोविंदा तिथे कधीकधी बैठका घेतो, तर कधीकधी तिथेच झोपतो. पण असं असलं तरी दोघं एकत्र राहत आहेत असं वकिलाने स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांवर बोलताना ललित बिंदाल यांनी, पॉडकास्ट आणि सार्वजनिक कार्यक्रमातील विधानांचा अर्धवट वापर करत त्यांच्याविरोधात वापर केला जात आहे असा आरोपही केला आहे.
मामाच्या घटस्फोटावर कृष्णा अभिषेकचंही भाष्य
दरम्यान मामाच्या घटस्फोटाच्या बातमीवर कृष्णा अभिषेकनेही भाष्य केलं आहे. जेव्हा कृष्णा अभिषेकला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने अशा बातम्यांचे स्पष्टपणे खंडन केले आणि म्हटले, “असे होऊ शकत नाही, तो घटस्फोट घेणार नाही” असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List