‘छावा’मध्ये कान्होजीच्या भूमिकेत पती सुव्रतला पाहून सखी म्हणाली, ‘तुझा द्वेष करावा की..’
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. यामध्ये अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता यांच्यासोबतच काही मराठी कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ज्या गणोजी आणि कान्होजी यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी फितुरी केली, त्यांची भूमिका अभिनेता सारंग साठ्ये आणि सुव्रत जोशीने साकारली आहे. नुकतंच सुव्रतची पत्नी आणि अभिनेत्री सखी गोखलेनं ‘छावा’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर तिने सोशल मीडियावर सुव्रतने साकारलेल्या भूमिकेसाठी पोस्ट लिहिली आहे.
‘तुम्ही तुमचं काम इतक्या दमदार पद्धतीने करा की अभिनयकौशल्यासाठी तुमच्यावर प्रेम करावं की तुमच्या भूमिकेचा द्वेष करावा याबद्दल पत्नीने संभ्रमात पडावं. तुझा खूप अभिमान वाटतो सुव्रत’, अशा शब्दांत सखीने कौतुक केलं आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सुव्रतचा एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो ‘छावा’च्या पोस्टरसमोर कान पकडून उभा असल्याचं पहायला मिळतंय. सुव्रतने या चित्रपटा कान्होजीची भूमिका साकारली आहे.
दरम्यान चित्रपटात दाखवलेल्या गणोजी आणि कान्होजी यांच्या भूमिकेवरून शिर्के घराण्याच्या वारसांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडतात, असं दाखवण्यात आलं आहे. याविरोधात शिर्के कुटुंबीयांनी न्यायालयात जाऊन लढाई लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. “महाराष्ट्रमध्ये खूप मोठा लढा उभा होतोय. शिर्के घराणं एकत्र येत आहे. त्यामुळे वातावरण तापण्याआधीच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातील वादग्रस्त भाग तात्काळ वगळावा’ अशी मागणी शिर्के कुटुंबीयांनी केली आहे.
शिर्के घराण्याच्या वारसांकडून झालेल्या आरोपांनंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांची माफी मागितली आहे. “आम्ही चित्रपटात फक्त गणोजी आणि कान्होजी या नावांचा उल्लेख केला आहे. त्यात त्यांच्या आडनावाचा कुठेच उल्लेख नाही. आम्ही त्यांच्या गावाचाही उल्लेख चित्रपटात टाळला आहे. शिर्के घराण्याच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. तरीसुद्धा जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो”, असं उतेकर म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List