मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सध्या सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीबद्दल सूचना केल्या होत्या. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या अर्धा तासांपासून राज ठाकरेंच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’वर सध्या बैठक सुरु आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस ‘शिवतीर्था’वर
आज सकाळीच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्था’वर दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोजही उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या २० मिनिटांपासून चर्चा सुरु आहे. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुका आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल होत आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या निकालावर रोखठोक वक्तव्य केले होते. त्यांनी या निकालावर थेट संशय व्यक्त केला होता. त्यातच आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही भेट महत्त्वाची असल्याचे बोललं जात आहे.
सदिच्छा भेट असल्याची चर्चा
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमापूर्वी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. ही भेट नियोजित नसल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र तरी या भेटीत राजकीय विषयांवर चर्चा होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा?
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागचे नेमकं कारण काय? त्यांच्या भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा केली जाणार? त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List