ओवी, अभंग, आर्या आणि तरुणाईचे रॅप; महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलन
महादजी शिंदे एक्सप्रेसमधून (पुणे ते दिल्ली साहित्ययात्रा): ओवी, अभंग, मोरोपंतांची आर्या, आणि तरुणाईची आधुनिक मराठी गीते, मराठी रॅप अशा विविधांगी कार्यक्रमांनी महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये वातावरण रंगले.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निघालेल्या पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाचा आजचा दुसरा दिवस रंगला.
देवा चांगभलं रं…, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतापासून गण, गवळण, अभंग, भक्तिगीते, भावगीते, लावणी, हिंदी चित्रपट गीते आणि अगदी मंगलाष्टकांपर्यंत विविध प्रकारांचे सादरीकरण झाले. मोठय़ा उत्साहात साहित्यिक आणि साहित्य रसिक या फिरत्या चाकांवरील संमेलनात सहभागी झाले. महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये नव साहित्यिकांचा उत्साह आणि ज्येष्ठ साहित्यिकांचे अनुभवविश्व यांचा सुरेख मेळ साधला गेला. 16 डब्यांच्या रेल्वेत प्रत्येक डब्यात छोटय़ा-मोठय़ा समुहांद्वारे स्वतंत्र उपक्रम राबवण्यात आले. पुण्याच्या अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकर्णी, साहित्य प्रेमी भार्गवी कुलकर्णी डॉ. हनुमंत जाधवर, वसंतराव जाधवर आदींनी स्वरचित कवितांची मैफल रंगविली.
हवामानाचा ठोसा
अंघोळीची गोळी आणि खिळे मुक्त झाडे या अभियानाचे प्रमुख माधव पाटील यांच्या ‘हवामानाचा ठोसा’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण विविध साहित्यिक आणि रसिकांच्या हस्ते या प्रवासात करण्यात आले.
ओळख अहिल्याबाईंची…
साताऱ्याहून खास संमेलनासाठी आलेल्या जयश्री माजगावकर यांनी अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा साकारली. येणाऱ्या पिढीला अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने ही वेशभूषा साकारली असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाला अतिरिक्त 2 कोटींचा निधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे सुरू होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला या संमेलनासाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून 2 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून हा निधी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा जीआर जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या निधीचा विनियोग मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास संवर्धन यासाठीच करावा लागणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List