संत तुकोबांचे मंदिर वर्षात पूर्ण होणार, भंडारा डोंगरावरील काम 70 टक्के पूर्ण
जगद्गुरू, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर व्हावे, ही सकल वारकरी संप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.
आजअखेर या मंदिराचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. वारकरी संप्रदायातील हे पहिलेच भव्य-दिव्य असे मंदिर असून, येत्या वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद व मंदिर बांधकामाचे नियोजन करणारे गजानन शेलार यांनी दिली. या मंदिरासाठी स्थापत्यविशारद म्हणून अयोध्यानगरीतील श्री प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर ज्यांच्या अलौकिक स्थापत्यकलेतून विराजमान झाले आहे, अशा चंद्रकांत सोमपुरा, निखिल सोमपुरा बंधू कार्यरत आहेत. तसेच मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेश सोमपुरा या पिता-पुत्रांनी घेतली आहे.
मंदिराची लांबी 179 फूट, उंची 87 फूट व रुंदी 193 फूट असून, मंदिराला तीन भव्य कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट 34 फूट बाय 34 फूट असून 13.5 बाय 13.5 फूट आकाराची एकूण 5 गर्भग्रहे मंदिरात असणार आहेत. मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहत भक्तीमध्ये दंग झालेली श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंदिराच्या बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून त्यावर 900 वैष्णवांच्या मूर्तीचे सुंदर असे कोरीव काम असणार आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संपूर्ण हिंदुस्थानमध्ये रयतेचे राज्य ही लोकशाही पूरक संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात प्रथम अंमलात आणली ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य-दिव्य शिल्प साकारले जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List