शाळेच्या पाचव्या मजल्यावरून विद्यार्थ्याने उडी मारून जीवन संपवलं, नवी मुंबईतील दुर्दैवी घटना
सीवूड येथील सेक्टर 44 मध्ये एका नामांकित शाळेत शिक्षण घेत असलेल्या नववीतील विद्यार्थ्याने आज शाळेतच आत्महत्या केली. हा विद्यार्थी आज सकाळी सातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत आला असता तो पाचव्या मजल्यावर गेला आणि तेथून त्याने खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण तयार झाले असून याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सीवूड येथील इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत शहराच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी येतात. आज नेहमीप्रमाणे नववीत शिक्षण घेणारा हा विद्यार्थी सकाळी सातच्या सुमारास शाळेत आला. शाळेत आल्यानंतर तो थेट पाचव्या मजल्यावर गेला. या मजल्यावर शाळा प्रशासनाने लोखंडी ग्रील लावले आहेत. हा विद्यार्थी या ग्रीलवर चढला आणि त्याने स्वतःला खाली झोकून दिले. थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. शाळा व्यवस्थापनाने त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि याप्रकरणी तपास सुरू केला. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली, याचा पोलीस शोध घेत आहेत. शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List