दिसेल तिथे ठेचा, गाडा नाहीतर गोळ्या घाला! उदयनराजेंची उघड धमकी, सोलापूरकरच्या सुरक्षेत वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरविरोधात राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत असताना छत्रपतींचे वंशज खासदार उदयन राजे यांनी उघड धमकीच दिली आहे. महापुरुषांबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्यांना दिसेल तिथे ठेचले पाहिजे, गाडले पाहिजे. गोळ्या घातल्या पाहिजेत असा संताप त्यांनी व्यक्त केला. अशा विकृतींची वाढ झाल्यास देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल असे सांगतानाच सोलापूरकर हा औरंगजेबाजी औलाद असल्याची तोफही त्यांनी डागली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्राहून सुटका करून घेताना मुघलांना लाच दिल्याचे संतापजनक व्यक्तव्य अभिनेता सोलापूरकर याने केल्याचे समोर येताच राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. राज्यभरात सोलापूरकरविरोधात शिवप्रेमींकडून जोरदार आंदोलने करण्यात येत असून त्याला जोड्यांचा प्रसाद देण्यात येत आहे. शिवसेनेकडूनही सोलापूरकरविरोधात आंदोलन केले जात आहे. तर आता उदयनराजे भोसले यांनीदेखील आज पत्रकार परिषद घेत सोलापूरकर विरोधात संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यासाठी, प्रजेसाठी जिवाची पर्वा न करता धाडस केले. त्यामुळे अशा महापुरुषाबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्याला दिसेल तिथे ठेचले पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
अशा अभिनेत्यांचे सिनेमे बंद केले पाहिजेत
सोलापूरकरसारखी वक्तव्ये केल्यामुळे शिवप्रेमींना वेदना होतात. तो म्हणतो, लाच दिली. कारण त्याला लाचेपलीकडे काही समजत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. अशा विकृत लोकांमुळे वेगवेगळ्या जातीधर्मात तेढ निर्माण होते, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे अशा अभिनेत्यांचे सिनेमे बंद केले पाहिजेत. अशा लोकांना निर्माते, दिग्दर्शकांनीही थारा देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सोलापूरकरसारख्या विकृतावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार असल्याचेही उदयन राजे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List