सामना अग्रलेख – …म्हणे हे हिंदूंचे रक्षक! बांगलादेशात पुन्हा हल्ले
बांगलादेशातील हिंदू आज एका असहाय्य अवस्थेत भारताकडे आशेने पाहात आहे, पण दिल्लीतील राज्यकर्त्यांचे ना हिंदुत्व हुंकार भरत आहे ना त्यांची तथाकथित ‘56 इंची’ छाती थरथरत आहे. कारण देशातील हिंदू त्यांना फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लागतात आणि परदेशातील हिंदूंना ते वाऱ्यावरच सोडतात. शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणावरून बांगलादेशसारखा टीचभर देश भारताला इशारे देतो, मोदीमित्र ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतो आणि मोदी सरकार ढिम्मच राहते. ‘विश्वगुरूं’च्या फुग्यात आता हवा राहिलेली नाही. त्यामुळेच ना ते अमेरिकेतील भारतीयांच्या नोकऱ्यांवर आलेले गंडांतर रोखू शकत आहेत, ना बांगलादेशातील हिंदूंवर वारंवार होत असलेले हल्ले… आणि हे म्हणे हिंदूंचे रक्षक!
पंतप्रधान मोदी गंगेत अमृतस्नानाची डुबकी मारून त्यांच्या हिंदुत्वाचे ‘प्रदर्शन’ करीत होते आणि तिकडे बांगलादेशातील हिंदूंवर पुन्हा हल्ले सुरू झाले. बुधवारी बांगलादेशात परत हिंसाचार उफाळला. त्यात बांगलादेशचे संस्थापक आणि पदभ्रष्ट पंतप्रधान शेख हसिना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या घराची तोडफोड करण्यात आली. तेथे जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचाराला कारण ठरले ते हसिना यांचे बुधवारी रात्री होणारे ‘लाइव्ह’ भाषण. इकडे हसिना यांचे लाइव्ह भाषण सुरू झाले आणि तिकडे त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचे घर हल्लेखोरांनी भस्मसात केले. बांगलादेशात उफाळलेला हा हिंसाचार योग्य की अयोग्य, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तो रोखला का नाही, बघ्याची भूमिका का घेतली, असे अनेक प्रश्न असले तरी भारताच्या दृष्टीने त्यापेक्षा अधिक चिंताजनक आहे ते या हिंसाचाराच्या आडून तेथे होत असलेले हिंदूंवरील हल्ले. बुधवारीही हल्लेखोरांनी फक्त शेख हसिना यांच्या अवामी लीगच्या कार्यकर्त्यांवरच हल्ले केले असे झाले नाही. ही
संधी साधून
हिंदूंवरही हल्ले करण्यात आले. राजशाही जिल्ह्यातील फुदकी पारा गावात हिंदूंच्या घरांवर हल्ले केले गेले. तेथील मंदिरातील सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. सत्तांतर झाल्यापासून बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचे सत्र थांबलेले नाही. हिंदू महिला, मुली यांच्यावर होणारे अत्याचार कमी झालेले नाहीत. पोतुआखवी जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणाच्या त्रासाला कंटाळून इती दास या हिंदू मुलीने अलीकडेच स्वतःचे जीवन संपवून घेतले. बांगलादेशातील हिंदूंना आज कोणी वाली राहिलेला नाही. ना तेथील मोहम्मद युनूस सरकार त्यांचे रक्षण करीत आहे, ना शेख हसिना यांना ‘राजाश्रय’ देणारे आणि स्वतःला ‘हिंदुत्वरक्षक’ म्हणवून घेणारे मोदी सरकार हे सगळे रोखण्यासाठी युनूस सरकारवर दबाव निर्माण करू शकले आहे. बांगलादेशातील हिंदू, त्यांची घरे, त्यांचे व्यवसाय, त्यांच्या शिक्षण संस्था, मंदिरे यांच्यावर सर्रास हल्ले होत आहेत. या सरकारची मातृसंस्था रा. स्व. संघाने एकदा काय
मोदी सरकारला जाणीव
करून दिली ती तेवढीच. नंतर त्यांनीही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराबाबत मौनच बाळगले आहे. बांगलादेशातील हिंदू आज प्रचंड दहशतीत जगतो आहे. एका हतबल आणि असहाय्य अवस्थेत भारताकडे, येथील राज्यकर्त्यांकडे आशेने पाहात आहे, पण दिल्लीतील राज्यकर्त्यांचे ना हिंदुत्व हुंकार भरत आहे ना त्यांची तथाकथित ‘56 इंची’ छाती थरथरत आहे. कारण त्यांचे हिंदुत्व आणि हिंदू धर्म ही त्यांच्यासाठी फक्त राजकीय सोय आहे. देशातील हिंदू त्यांना फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लागतात आणि परदेशातील हिंदूंनाही ते वाऱ्यावरच सोडतात. शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणावरून बांगलादेशसारखा टीचभर देश भारताला इशारे देतो, मोदीमित्र ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतो आणि मोदी सरकार ढिम्मच राहते. ‘विश्वगुरूं’च्या फुग्यात आता हवा राहिलेली नाही. त्यामुळेच ना ते अमेरिकेतील भारतीयांच्या नोकऱ्यांवर आलेले गंडांतर रोखू शकत आहेत, ना बांगलादेशातील हिंदूंवर वारंवार होत असलेले हल्ले… आणि हे म्हणे हिंदूंचे रक्षक!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List