लक्षवेधक – रेल्वेत तब्बल 32 हजार पदांची भरती सुरू
रेल्वेत तब्बल 32 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली असून आरआरबी ग्रुप डी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. पहिला टप्पा सीबीटी आधारित परीक्षा, दुसरा टप्पा पीईटी आणि तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणीचा आहे.
विवाहबाह्य डेटिंग अॅपवर 30 लाख हिंदुस्थानी सक्रिय
विवाहबाह्य डेटिंग अॅप ग्लीडनवर तब्बल 30 लाख हिंदुस्थानी युजर्स सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. फ्रान्समध्ये 2009 मध्ये सुरू झालेले हे अॅप विवाहित व्यक्तींसाठी विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु हे अॅप आता हिंदुस्थानातसुद्धा लोकप्रिय झाले आहे. 30 लाख युजर्सपैकी सर्वात जास्त बंगळुरू शहरातील युजर्स आहेत. 2024 च्या तुलनेत महिला युजर्सची संख्या 128 टक्क्यांनी वाढल्याचा दावासुद्धा ग्लीडनने केला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस24 अल्ट्रावर 30 हजार सूट
सॅमसंग कंपनीने नुकताच आपला सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनच्या लाँचिंगनंतर आधीचा सॅमसंग गॅलेक्सी एस24 अल्ट्रा फोन 30 हजार 645 रुपयांच्या सूटवर मिळत आहे. या फोनच्या 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज फोनला अॅमेझॉन इंडियावर 99,354 रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. या फोनमध्ये 6.7 इंचाचा 1.2 के रिझॉल्यूशन डिस्प्ले दिला आहे.
एचडीएफसी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी
एचडीएफसी बँकेत असिस्टेंट मॅनेजर पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत अनेक पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. बँकेच्या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईट www.hdfcbank.com वर देण्यात आली आहे. वेबसाईटच्या प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्रामला क्लिक केल्यानंतर भरतीसंबंधी माहिती दिसते.
मस्त! जपानमध्ये ‘लापता लेडीज’ची हवा
किरण राव आणि आमीर खान निर्मित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची जपान अकादमी फिल्म पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे. ‘लापता लेडीज’सोबतच ‘ओपेनहाइमर’, ‘द जोन ऑफ इंटरेस्ट’, ‘पूअर थिंग्स’ आणि एलेक्स गारलँड यांचा ‘सिविल वॉर’ या चित्रपटालासुद्धा या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. ‘लापता लेडीज’ जपानमधील चित्रपटगृहात 115 दिवसांपासून सुरू आहे.
पेटीएमचे सीईओ नकुल जैन यांचा राजीनामा
पेटीएम पेमेंट सर्व्हिसचे सीईओ नकुल जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्टॉक एक्सचेंजच्या फायलिंगमध्ये पंपनीने याची माहिती दिली. नकुल यांच्या राजीनाम्यानंतर पंपनी नव्या सीईओच्या शोधात आहे. लवकरच नव्या नावाची घोषणा करण्यात येईल, असे पंपनीकडून सांगण्यात आले आहे. नकुल जैन यांनी राजीनामा देण्यामागील कारणसुद्धा सांगितले आहे. ते आता स्वतः नवा व्यापार सुरू करणार आहेत.
अमेरिकन लष्करात ट्रान्सजेंडर्स भरतीवर बंदी
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार सत्तेत आले असून या नव्या सरकारने धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकन लष्करामध्ये आता ट्रान्सजेंडर्स भरतीवर बंदी आणली जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. कार्यकारी आदेशांतर्गत नवीन संरक्षणमंत्री पीट हेगसेथ पेंटागन या धोरणावर विचार करतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List