मुंबईकरांवर ‘अदानी कर’ लावण्याचा डाव, आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात
पालिकेच्या देवनार डंपिंग ग्राऊंडची जागा स्वच्छ करून ती अदानीच्या घशात घालण्यासाठी दोन ते अडीच हजार कोटींचे टेंडर काढण्याचे आदेश राज्य सरकारने पालिकेला दिले आहेत. अदानी समूहावर सवलतींची खैरात आणि येणाऱया बजेटमध्ये मुंबईकरांवर ‘अदानी कर’ लावण्याचा डाव आहे. ‘कराचा बोजा मुंबईकरांवर आणि जमिनी अदानी’ला… हा कुठला न्याय!, असा सवाल करीत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सरकारवर घणाघात केला.
आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सरकारचे ‘अदानीप्रेम’ आणि नागरी समस्यांबाबतच्या अनास्थेचा समाचार घेतला. धारावीच्या पुनर्विकासाला आमचा विरोध नाही, मात्र या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे. इथे असणाऱया व्यावसायिकांसाठी जागा मिळायला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. आम्ही सत्तेत आलो असतो तर धारावीसाठी नव्याने टेंडर मागवले असते, असेही ते म्हणाले. भाजप-मिंधे सरकारने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट धारावी पुनर्विकासासाठी 10 टक्के कमी दराने देण्याचा घाट घातल्याचा आरोपही त्यांनी केला. देवनार डंपिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घातल्यास मुंबईकरांचा कचरा कुठे टाकणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे पैसे अदानीच्या घशात घालण्यापेक्षा आर्थिक अडचणीत असणाऱ्या बेस्टला मदत करा, असे आवाहनही त्यांनी केल. आम्ही गोराईच्या डंपिंगचे बायोमायनिंग करून त्यावर उद्यान उभारल्याचेही ते म्हणाले. मात्र हे सरकार हे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे. कुर्ला येथील मदर डेअरीचा प्लॉटही अदानीना आंदण देण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले.
पाणीपुरवठा विस्कळीत, मुंबई खोदल्याने मनस्ताप
मुंबईच्या अनेक भागांत कमी दाबाने पाणी येते, तर काही ठिकाणी गढूळ तर काही ठिकाणी पाण्याचा प्रेशर कमी असतो. प्रदूषणाची स्थितीदेखील वाईट आहे. सी लिंकवरून 100 मीटरवरील अंतरापुढील काही दिसत नाही. त्यामुळे पालिका, राज्य सरकार आणि राज्याचा प्रदूषण नियंत्रण विभाग करतो तरी काय, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. संपूर्ण मुंबई खोदून ठेवल्याने वाहतूककोंडी होत असून प्रवासी, वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रश्नांबाबत मुंबईकरांना उत्तर द्यायला सरकारमधील कुणी पुढे का येत नाही, प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील ईव्हीएम सरकार जनतेसाठी काम करते की अदानीसाठी, असा सवालही त्यांनी केला.
पालिकेचे विद्यार्थी देणार केंद्रीय बोर्डाची परीक्षा
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे पालिका शाळांमध्ये आयसीएससी, सीबीएससी, आयबी, आयजीसीएससीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्या असून पालिका शाळांतील विद्यार्थी आता केंद्रीय बोर्डाच्या परीक्षा देणार असल्याचे पाहून आनंद झाल्याचे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव पालिका आहे ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या बोर्डाच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. याबद्दल 2011 ते 2022 पर्यंतची शिक्षण समिती, एनजीओ, शिक्षणतज्ञ आणि पालिका अधिकाऱयांचे आपण आभारी असल्याचेही ते म्हणाले.
- एल्फिन्स्टन पूल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात पाडण्यात येणार आहे. हा परीक्षांचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी परीक्षा झाल्यानंतर पूल बंद करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List