धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव 100 टक्के कमी होईल; धनंजय देशमुख यांची भूमिका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड मकोकासंर्गत तुरुंगात आहे. कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. तसेच या हत्येमागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पुरावे असल्यामुळेच चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असेल. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरचा 100 टक्के दबाव कमी होईल. मागच्या 10 दिवसांत अनेक घडामोडी घडल्या आहेत. काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव नक्कीच कमी होईल, असे मत धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. अंजली दमानिया यांनी पुरावे दिले आहेत. आपली न्यायाची मागणी आहे. क्रूरकर्मी लोकांनी जी हत्या केली आहे, त्याबाबत न्याय मिळावा, अशी आपली मागणी आहे. अटक केलेल्या आरोपींना आणि फरार असलेल्या एका आरोपीला अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीवर सर्वजण ठाम आहेत,असेही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List