‘अचानक-भयानक महिला वर्गाविषयी पुळका..’; प्राजक्ता माळी प्रकरणावरून किरण मानेंकडून कलाकारांची कानउघडणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी धस यांनी अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचा निकडचा सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर गेल्या काही दिवसांत सातत्याने आरोप केले. त्यात त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचाही उल्लेख केला. राजकीय वादात आपल्याला ओढून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न धस यांनी केला असून त्यांनी माफी मागावी, अशी प्राजक्ताने मागणी केली. यासंदर्भात तिने पत्रकार परिषद घेतली होती. प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी तिला जाहीर पाठिंबा दिला. कुशल बद्रिके, सचिन गोस्वामी यांसारख्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. आता अभिनेते किरण माने यांनी याप्रकरणी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. प्राजक्ताबाबतचं विधान निंदनीय असल्याचं म्हणत त्यांनी मराठी कलाकारांचीही कानउघडणी केली.
किरण माने यांची पोस्ट-
‘प्राजक्ताबाबतचे विधान निंदनीयच आहे, त्याचा निषेध. पण सोनियाजींचे बिकीनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते, कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दाद मागत होत्या, मणिपूरला भगिनींची विटंबना झाली, तेव्हा जे महाभाग मुग गिळून वगैरे गप्प बसले, त्यांना अचानक-भयानक ‘समस्त महिलावर्गाविषयी’ पुळका वगैरे यावा हे फार विनोदी वगैरे आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी #सुमारांचा_थयथयाट असा हॅशटॅगसुद्धा नमूद केला आहे. किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे मात्र बरोबर आहे दादा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘बीड, परभणी प्रकरणावर गप्प बसणारे आता समोर आले आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
भाजप नेते आणि आष्टीचे आमदार सुरेश धस हे रोज माध्यमांशी बोलताना अनेक गौप्यस्फोट करत आहेत. सुरेश धस बोलताना सतत आकाचा उल्लेख करतात. आकाची बीडमध्ये दहशत आहे, असा धस यांचा दावा आहे. सुरेश धस यांनी अजून आकाच नाव उघड केलेलं नाही. पण टीका करताना त्यांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असतो. धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतली. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी यांची नावं त्यांनी घेतली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List