लँडिंग झाले… मेपासून नवी मुंबईतून टेक ऑफ; 17 एप्रिलला होणार आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो ए 320 या व्यावसायिक प्रवासी विमानाचे आज यशस्वी लँडिंग झाले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी उड्डाण केलेले हे विमान नवी मुंबई विमानतळावर 1 वाजून 38 मिनिटांनी उतरले आणि उपस्थितांनी जल्लोष केला.
विमानतळाचे काम येत्या 30 मार्चपर्यंत पूर्ण होणार असून उद्घाटन 17 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभर हवाई प्राधिकरणाच्या वतीने काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मे 2025 पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सुरू होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दक्षिण धावपट्टी 8/26 चे काम पूर्ण झाल्यानंतर हवाई प्राधिकरणाच्या वतीने सिग्नल, रडार आणि प्रिसिजन अॅप्रोच पाथ इंडिकेटर (पीएपीआय) या महत्त्वाच्या चाचण्या घेण्यात आल्या. या सर्वच चाचण्या यशस्वी झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने आज प्रत्यक्षात विमान उतरवण्याची चाचणी घेतली. लँडिंग झाल्यानंतर विमान धावपट्टीवरून यू टर्न घेऊन ज्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी 1 वाजून 45 मिनिटांनी पोहोचले. या ठिकाणी ऑस्ट्रेलियामधून आणलेल्या फायर टेंडरने पाण्याचे फवारे उडवून विमानाचे भव्य स्वागत केले. या पहिल्या विमानातून हवाई प्राधिकरणाच्या अधिकारी आणि हवाई सुंदरी यांनी मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास केला. विमान थांबवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, अदानी समूहाचे विशेष कार्यकारी अधिकारी बी. व्ही. जे. के. शर्मा यांनी वैमानिकांचे आणि हवाई प्राधिकरणाच्या अधिकाऱयांचे स्वागत केले. याप्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, उरणचे आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते.
दक्षिण धावपट्टी सक्षम
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीचे काम पूर्ण झाले आहे. ही धावपट्टी विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग करण्यासाठी यशस्वी ठरली आहे. विमानतळाच्या टर्मिनलचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यानंतर विमानतळाचे उद्घाटन येत्या 17 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी यावेळी स्पष्ट केले.
दररोज अडीचशे विमानांचे उड्डाण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम चार टप्प्यांत होणार आहे. त्यापैकी दोन टर्निलचे काम पहिल्या टप्प्यात सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. वर्षभरात या विमानतळावरून सुमारे अडीच कोटी प्रवासी प्रवास करणार आहेत. दररोज सुमारे अडीचशे विमानांचे उड्डाण या ठिकाणाहून होणार आहे, असे अदानी समूहाचे विशेष कार्यकारी अधिकारी बी. व्ही. जे. के. शर्मा यांनी सांगितले.
रखडलेला प्रकल्प सहा वर्षांत मार्गी लागला
मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई विमानतळाची संकल्पना पुढे आली होती. या विमानतळ निर्मितीची जबाबदारी राज्य सरकारने सिडकोकडे दिल्यानंतर सिडकोने निविदा प्रक्रिया राबवली. 13 फेब्रुवारी 2017 रोजी विमानतळ निर्मितीचे काम जीव्हीके या समूहाला देण्यात आले. एप्रिल 2017 मध्ये सपाटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली. 14 जून 2017 पासून सपाटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. जीव्हीके समूहाने सप्टेंबर 2019 मध्ये विमानतळ बांधणीचे काम एल अॅण्ड टी पंपनीला दिले, मात्र पुढे हा समूह आर्थिक अडचणीत सापडला. त्यामुळे विमानतळ उभारणीचे हक्क अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले. अदानी समूहाने 2021 मध्ये विमानतळाच्या कामाला सुरुवात केली. दक्षिण धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर आज प्रत्यक्ष व्यावसायिक प्रवासी विमान धावपट्टीवर उतरवण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प सहा वर्षांत मार्गी लागला आहे.
दुसऱ्या धावपट्टीचे काम अडीच वर्षांनंतर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण दोन धावपट्ट्या असणार आहेत. त्यापैकी उत्तर धावपट्टीचे काम अडीच वर्षांनी सुरू करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावरून सध्या वर्षाला पाच कोटी प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या विमानतळावरून वर्षाला नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील.
पाण्याच्या फवाऱयाची सलामी, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष
हवेमध्ये एक तास चार मिनिटे घिरटय़ा घातल्यानंतर दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी विमान नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर उतरले. तेव्हा उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट करून मोठा जल्लोष केला. ऑस्ट्रेलियातून आणलेल्या फायर टेंडरने पाण्याचे फवारे मारून विमानाचे जोरदार स्वागत केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List