दिंडोशीत टेकडीवर तर हाजी अली येथे हीरा पन्ना शॉपिंग सेंटरला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
दिंडोशी येथे शनिवारी रात्री वाळलेल्या पालापाचोळय़ामुळे टेकडीवर, तर हाजी अली येथे सकाळी हीरा पन्ना शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यावर गाळय़ांना आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.
गोरेगावमधील दिंडोशी येथील आयटी पार्कच्या बाजूला असलेल्या एक किलोमीटरच्या टेकडीवर शनिवारी रात्री 12 च्या सुमाराला आग लागली. वाळलेला पालापाचोळा, झाडे यामुळे सकाळी ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, अग्निशमन दलाने तातडीने कार्यवाही केली. तब्बल दोन तासांच्या अथक मेहनतीनंतर ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
हाजी अली येथील प्रसिद्ध हीरा पन्ना शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यावरील 11 आणि 12 नंबरच्या दोन व्यावसायिक गाळय़ांमधील पोटमाळय़ांना सकाळी 9 च्या सुमाराला आग लागली. धूर बाहेर येऊ लागल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी याची सूचना अग्निशमन दलाला दिली. घटनास्थळी पोहोचत अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. रविवार असल्यामुळे हे शॉपिंग सेंटर बंद होते. दरम्यान, अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीतील वीजपुरवठा खंडित केला आहे.
पोटमाळ्यातील सामान जळून खाक
पोटमाळय़ात असलेल्या वायरिंग, कपडे, लाकडी सामान, काचेचे सामान, कागदी साहित्य, पादत्राणे, सुगंधी साहित्य, मोबाईल्स, फॉल्स सेलिंग या वस्तू यात जळून खाक झाल्या. याबाबतही पुढील तपास पोलीस आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List