संविधानाच्या विटंबनेविरुद्ध आंदोलन करणा ऱ्या तरुणाचा कोठडीत संशयास्पद मृत्यू, रिपब्लिकन सेनेची आज महाराष्ट्र बंदची हाक
परभणी येथे संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर संविधानाच्या विटंबनेविरोधात आंदोलन करणा ऱ्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या आंदोलकाचा आज सकाळी न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेचे परभणीसह मराठवाड्यात तीव्र पडसाद उमटले. परभणीत तणाव वाढल्याने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. नांदेडमध्ये जमावाने गाडय़ांची तोडफोड केली. पुर्णेत आंबेडकरी समाजाने मोर्चा काढून सरकारचा निषेध केला तर रिपब्लिकन सेनेने या घटनेच्या निषेधार्थ उद्या 16 रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनांनी घेतला आहे. दरम्यान, राज्यात इतकी गंभीर घटना घडली असताना तीन पायांचे सरकार मात्र नागपुरात मंत्रिपदांची झुल पांघरण्यात मग्न होते. या घटनेने राज्यातील इव्हेंटबाज सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.
10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना करण्यात आली. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. त्यात परभणी व परिसरात तुफान दगडफेक, जाळपोळ झाली. त्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग कॉपरेशन करून रात्री-बेरात्री आंबेडकरी अनुयायांना पकडून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. त्यातीलच एक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (35, रा. शंकरनगर)या आंदोलकाचा आज कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. तो श्री शिवाजी महाविद्यालयात वकीलीचे शिक्षण घेत होता.
संभाजीनगरात होणार शवविच्छेदन
या ठिकाणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील सुद्धा दाखल व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्याचे शवविच्छेदन हे संभाजीनगर येथे करण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यास मंजुरी दिली. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास संभाजीनगरकडे नेण्यात आले.
पोलिसांचा समाजाशी संवाद
रुग्णालयात जमा झालेले लोकप्रतिनिधी, समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनी संवाद साधला. सूर्यवंशी याच्या पश्चात आई-वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रसंगी लोकनेते विजय वाकोडे, शिवसेनेचे प्रशास ठाकूर, भीमराव हत्तीअंबिरे, रवी सोनकांबळे, सिद्धार्थ हत्तींअबीरे, सुधिर साळवे, अॅड. पवन जोंधळे, चंद्रकांत लहाने, प्रदीप वाव्हुळे, आकाश लहाने यांची उपस्थिती होती.
दोन दिवस पीसीआर, नंतर एमसीआर
बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. सदर प्रकरणात नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात असलेल्या आंदोलक सूर्यवंशी यास दोन दिवस पीसीआरनंतर शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत नेण्यापूर्वी त्याचे मेडिकल करण्यात आले होते. त्यानंतर सर्व आंदोलकांना न्यायालयीन कोठडीत नेण्यात आले. आज सकाळी पावणे सात वाजेच्या दरम्यान कोठडीत त्याचा मृत्यू झाला. भांबावलेल्या पोलिसांनी त्याला सामान्य रुग्णालयात नेले. तेथे प्रथमवर्ग न्यायमूर्ती तेलवाडकर यांनीही भेट दिली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून सोमनाथ याला मृत घोषित केले. बातमी वा ऱ्यासारखी शहरभर पसरली व सर्व आंबेडकर अनुयायी सामान्य रुग्णालयात जमले. त्यानंतर थेट सामान्य रुग्णालयातून आंबेडकर अनुयायी आज जिल्हाधिकारी कार्यालयास सुटी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी गेले व तेथे आंबेडकरी अनुयायांसोबत माजी कोषाध्यक्ष, जिल्हा परभणी वकील संघाचे अॅड. विश्वनाथ आंभोरे यांनी निवेदन दिले.
बस सेवाही बंद
घटनेची माहिती पसरताच परभणीत बाजारपेठ बंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बस सेवाही बंद करण्यात आली. पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली.
आंबेडकरी पक्ष संघटना बंदमध्ये सहभागी होणार
महाराष्ट्र बंदमध्ये रिपब्लिकन सेनेसह पँथर्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पक्ष, भीमशक्ती सामाजिक संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र, भारतीय क्रांती दल, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, बीआरएसपी, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष, आजाद समाज पार्टी, भीमआर्मी, भारत एकता मिशन, रिपाई (खरात), रिपब्लिकन विद्यार्थी सेना, ऑल इंडिया समता सैनिक दल, पँथर सेना, रिपाई (राजरत्न आंबेडकर), आंबेडकरवादी बहुजन विकास समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संविधान बचाव आघाडी, भीमशक्ती रोजदारी कर्मचारी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, भारतीय दलित पँथर, स्वतंत्र लोकसत्ता पक्ष, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आदी पक्ष संघटनांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी
सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा तुरुंगात मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. सरकारने सोमनाथची हत्याच केली आहे. याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तसेच सोमनाथच्या कुटुंबाला सरकारने 25 लाखांची मदत द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. परभणीची परिस्थिती हाताळण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. आंबेडकरी अनुयायांवर पोलीसांनी अमानुष अत्याचार केले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्यानंतर नांदेड शहरात आज सकाळपासून तणावाचे वातावरण पसरले. शहरातील सर्व व्यापारपेठा तत्काळ बंद करण्यात आल्या. सोमेश कॉलनी येथे अज्ञात जमावाने कार फोडली. तर एका ऑटोवर दगडफेक केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List