‘प्रफुल्ला‘ प्रदर्शनाला कलाप्रेमींची दाद
जगप्रसिद्ध हिंदुस्थानी चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्या चित्रांवर आधारित ‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ प्रदर्शन सध्या काळाघोडा येथील जहांगीर आर्ट कलादालनात सुरू आहे. 16 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे. प्रफुल्ला यांनी काढलेली अनेक उत्तमोत्तम निसर्गचित्रे, मानवी आकृतीबंध आणि अमूर्त चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. त्यांच्या आजवर जगासमोर न आलेल्या चित्रांचा समावेशही या प्रदर्शनात आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन कला इतिहासकार, संशोधक डॉ. सरयू दोशी आणि कला इतिहासकार, लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज यांच्या हस्ते झाले. ‘‘प्रफुल्ला या स्वतः एक उत्तम कलाकार तर होत्याच पण इतर होतकरू आणि नवोदित कलाकारांना मदत करण्याची तळमळही त्यांच्या अंगी होती. कलाकारांसोबतच त्या कलाप्रेमीही होत्या. त्यामुळेच कलेच्या संवर्धनासाठी आणि वाढीसाठी जे जे त्यांना शक्य होते ते ते त्यांनी केले,’’ अशा भावना डॉ. सरयू दोशी यांनी व्यक्त केल्या. प्रदर्शनाला प्रफुल्ला यांचे कुटुंबीय, बेथ सिट्रॉन, सविता आपटे, इतर कलासमीक्षक, कलाअभ्यासक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी उपस्थित होते.
प्रफुल्ला डहाणूकर यांच्या कन्या गौरी डहाणूकर-मेहता आणि गोपिका डहाणूकर यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. न्यूयॉर्क येथील एशिया सोसायटीच्या कला इतिहासकार आणि समीक्षक बेथ सिट्रॉन यांनी हे प्रदर्शन क्युरेट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List