राहणार तर महाराष्ट्रात, नाहीतर तुरुंगात; बेळगावात मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांची दडपशाही, शिवसैनिकांना रोखले, कोगनोळी टोलनाक्यावर पोलिसांशी चकमक

राहणार तर महाराष्ट्रात, नाहीतर तुरुंगात; बेळगावात मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांची दडपशाही, शिवसैनिकांना रोखले, कोगनोळी टोलनाक्यावर पोलिसांशी चकमक

बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा रोखण्यासाठी कानडी पोलिसांनी जुलूमशाहीचा दंडुका चालवला. आज पहाटेपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली. त्यानंतरही अनेक मराठी बांधव गनिमी काव्याने मेळाव्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात थडकले. त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आल्याने संतापाचा भडका उडाला. ‘राहणार तर महाराष्ट्रात, नाहीतर तुरुगांत’, ‘बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणा देत मराठी भाषिकांनी कानडी सरकारला ललकारले. दरम्यान, कर्नाटक सरकारची प्रवेशबंदी झुगारून कोल्हापुरातील शिवसैनिकांनी कर्नाटकात धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोगनोळी टोलनाक्यावर शिवसैनिकांना रोखण्यात आले. तिथे पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार चकमक उडाली.

बेळगावसह मराठी भाषिक सीमाभागावर दावा करण्यासाठी कर्नाटक सरकारची सातत्याने कारस्थाने सुरू आहेत. त्यातून बेळगावला कर्नाटकची उपराजधानी जाहीर करून तिथे विधानसौध उभारण्यात आले. याठिकाणी दरवर्षी मुद्दामहून हिवाळी अधिवेशन घेतले जाते. या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांचा महामेळावा घेण्यात येतो. यंदाही या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी मागण्यात आली मात्र ही परवानगी नाकारण्यात आली. त्याचवेळी बेळगावातील अनेक भागांत जमावबंदी लागू करून महाराष्ट्रातील नेत्यांनाही प्रवेशबंदी करण्यात आली. त्यानंतरही सीमाबांधव मेळावा घेण्यावर ठाम होते. मात्र, आज दडपशाही करून कानडी पोलिसांनी हा मेळावा रोखला.

महाराष्ट्रातून महामेळाव्यासाठी येणाऱया नेते व कार्यकर्त्यांना अटकाव करण्यासाठी बेळगावकडे येणाऱया सर्वच मार्गांवर गेल्या दोन तीन दिवसांपासून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोनगोळी टोलनाका तसेच चंदगड आणि गडहिंग्लजमधून बेळगावकडे येणाऱया वाहनांची कसून तपासणी केली जात होती. आज त्याचा अतिरेक करण्यात आला.

बेळगावच्या विधानसभेमधील सावरकरांची प्रतिमा हटविण्याच्या निर्णयाचा निषेध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला समृद्ध केले. मराठीला प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले. त्यांची प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लावण्यात आली होती. तिथले कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, आम्ही बेळगावच्या विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू. देशाच्या इतिहासामध्ये दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्यसेनानी, या देशाचे मानबिंदू आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचादेखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले.

बेळगाव केंद्रशासित करा, विधान परिषदेतही मागणी

बेळगाव-कारवार केंद्रशासित करा, ही मागणी शिवसेनेने आज विधान परिषदेत लावून धरली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक सरकारकडून बेळगाव-कारवारमध्ये मराठी माणसावर अन्याय होत आहे. त्यांची मुस्कटदाबी होत आहे. मराठी भाषिक महामेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. तेथील कार्यकर्त्यांना अटक केली. त्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे दानवे म्हणाले. बेळगाव-कारवार सीमावर्ती भाग केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र सरकारला पाठवण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने मराठी बांधवांच्या पाठीशी

महाराष्ट्रातले सरकार आणि विधानमंडळ एकमताने आणि पूर्ण शक्तीने तेथील मराठी बांधवांच्या पाठीशी आहे, असे दानवे यांच्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर अत्याचार होतोय त्याचा आम्ही निषेध करतोय. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला विरोध करून स्वातंत्र्याने प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार आहे त्याचे उल्लंघन कर्नाटकात होतेय, अशी कबुलीही फडणवीस यांनी यावेळी दिली. सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येत नाही तोपर्यंत आपण लढत राहू. महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आणि जगभरातील मराठी माणसे एकदिलाने सीमाबांधवांच्या पाठीशी आहेत. बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा प्रकारचा निर्धार आम्ही करतो, असे फडणवीस म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेण्याचा मराठी भाषिकांचा निर्धार होता. भगवे झेंडे घेऊन निघालेल्या मराठी भाषिकांना अर्ध्या वाटेतच कानडी पोलिसांकडून जबरदस्तीने अटक केली. तरीसुद्धा गल्लीबोळातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात मराठी भाषिक धडकले. मराठी भाषिकांना कानडी पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन पोलीस वाहनात बसविले. काही ज्येष्ठांना धक्काबुक्की करण्यात आली.

पहाटेपासून धरपकड, मोबाईलही काढून घेतले

मराठी भाषिकांची आज पहाटेपासूनच धरपकड करण्यात आली. घरातून, रस्त्यातून उचलून तुरुंगात डांबण्यात आले. मॉर्निक वॉक घेत असतानाही काहींना पकडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस, माजी महापौर मालोजी आष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर सरीता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शुभम शेळके, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, श्रीकांत कदम, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो समिती कार्यकर्ते व महिलांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अटक करून डांबण्यात आले. त्यांचे मोबाईलही काढून घेण्यात आले.

बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी बेळगाव-कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव विधिमंडळात घ्यावा. आम्ही एकमताने त्या ठरावास पाठिंबा देऊ. त्यानंतर तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती करणारे पत्र शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

बेळगाव-कारवारचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. आता तो गंभीर होत चालला आहे. त्यामुळे तेथील मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणता. तेथील मराठी माणसांना न्याय देण्यासाठी बेळगाव-कारवार केंद्रशासित करणे आवश्यक आहे असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

विधिमंडळात तीव्र पडसाद, विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना आमदारांची निदर्शने

बेळगावात मराठी बांधवांवर होत असलेल्या कानडी अत्याचाराचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले. शिवसेनेच्या आमदारांनी सभात्याग करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायऱयांवर जोरदार निदर्शने केली. बेळगाव केंद्रशासित झालाच पाहिजे, सीमाभागातील मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी यावेळी सारा परिसर दणाणून गेला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षांनी यावरून आवाज उठवला. त्यावर महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्तीने सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट 40 रुपयांचा लसूण तब्बल 400 रुपयांना, लाडक्या बहिणींना कमळाबाईचे न्यू ईयर गिफ्ट
लाडक्या बहिणींना कमळाबाईने न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेला आहे, तर काही भाज्या 30 ते...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
ज्येष्ठ शिवसैनिक अशोक दळवी यांचे निधन
राजकीय बॅनर, पोस्टर, होर्डिंगवर बंदी घाला, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
‘शक्ती’ कायद्याची फाईल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे, शिवसेनेच्या मागणीला यश
पदभार स्वीकारताच मंत्र्यांच्या चमकोगिरीच्या ‘चॅनल’ बैठका
फोनवर बोलणे स्वस्त होणार, नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश