‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या बदलापूरचे महाविकास आघाजीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या. बदलापूर अत्याचार प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बदलापूरचं नाव देशात खराब झालं, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. इतकी मोठी घटना घडूनही गृहमंत्री बदलापुरात येत नाहीत हे दुर्दैवी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे या आज बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचार सभेसाठी आल्या होत्या. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी घणाघाती टीका केली. आम्ही तुम्हाला निवडून देणारच आहोत, पण निवडून आल्यानंतर ६ महिन्यात बदलापूरचं नाव सुधराल, असा शब्द मला तुमच्याकडून हवा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सुभाष पवार यांना म्हटलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बदलापूरचं नाव देशात खराब झालं. बदलापूरची बदनामी झाली. हे नाव तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या ६ महिन्यात ठीक करायचं, असं सुप्रिया सुळे यांनी सुभाष पवार यांना म्हटलं आहे. बदलापुरात इतकी गलिच्छ घटना होऊनही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापुरात आले नाहीत, मात्र त्यांचे पोस्टर शहरात सगळीकडे लागले, हे दुर्दैवी आहे. त्या दिवशी तुम्ही सगळे लोक रेल्वे स्टेशनवर उतरले नसते तर बाहेरच्या लोकांना कळलंही नसतं की बदलापुरात काय घटना घडली आहे? ही तुमची आणि मीडियाची ताकद आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी महागाईवरून देखील महायुती सरकारला जोरदार टोला लगावला आहे. यापूर्वी नणंदेकडे फराळाचा डबा पाठवताना एक मोठा डबा आणि सोबत माणूस पाठवावा लागायचा. यावेळी मी स्वतःच फराळाचा डबा घेऊन गेले, माणूसही सोबत घ्यावा लागला नाही. कारण फराळाचा डबाच छोटा झाला आहे, असा खोचक टोला यावेळी सुळे यांनी लगावला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List