सांगलीत नामसाधर्म्यामुळे दिग्गजांची डोकेदुखी वाढणार
निवडणुकीमध्ये नामसाधर्म्य आणि पक्षचिन्ह वाटप करताना एकसारखे दिसणारे चिन्ह हे मतदारांची दिशाभूल करतात. यामुळे अनेक जण आपल्या विरोधातील उमेदवारांच्या नावाचा शोध घेऊन त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून दाखल करतात. तसाच प्रकार सांगली जिह्यात झाला आहे. आमदार जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, रोहित पाटील, निशिकांत पाटील व जयश्री पाटील यांच्या नावाचे डमी उमेदवार उभे करून मतविभागणीचा प्रयोग केला गेला आहे. त्यामुळे दिग्गजांची डोकेदुखी वाढली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांच्या नावाने असणाऱ्या दुसऱ्या उमेदवाराला निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरविण्याचे प्रयत्न झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह आहे. या चिन्हाला साधर्म्य असलेले दुसरे चिन्ह म्हणजे पिपाणी. हे अपक्ष उमेदवाराला देऊन मते बाद करण्याचा अनेक मतदारसंघांत प्रयोग झाला. तोच पॅटर्न आता विधानसभेच्या निवडणुकीत वापरला जात आहे.
ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या नावाचे साधर्म्य असलेले जयंत पाटील नावाच्या दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. चिन्हवाटपावेळी आमदार जयंत पाटील यांना तुतारी चिन्ह असणार आहे. पण त्यांच्या नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराने जर पिपाणी चिन्ह मिळवले तर त्यांची डोकेदुखी बनणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List