Pune News – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज
देशभरात दीपावली मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मंदिरांवर रोषणाई आणि फुलांची सजावट केली जात आहे. पंढरपुरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आज लक्ष्मीपूजन कुबेरनिमित्त पोशाखावेळी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला अलंकार परिधान करण्यात आले, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम, कौस्तुभ मणी, दंडपेठ्या जोड, हिऱ्यांचा कंगन जोड, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्यांचा तुरा, शिरपेच मोठा दोन लोलक, शिरपेच मोठा दहा लोक, मत्स्य जोड, तोडे जोड, जवेची माळ दोन पदरी, एकदाणी, तांदळ्या हार सात पदरी, हायकोल, सूर्यकळ्यांचा हार इ. अलंकार परिधान करण्यात आले. तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकूट, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी पांढरी, हातसर जोड, पानाड्याचा हार, मद्रासी कंठा, जडावाचे ताणवड जोड, चंद्र, सूर्य, बाजीराव गरसोळी, खड्यांच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद जोड, मत्स्य जोड, रूळ जोड, पैंजण जोड, नथ, कर्णफुले जोड, ठुशी नवीन, सोन्याचा करंडा, तोडे जोड, छत्रछामर इ. अलंकार परिधान करण्यात आले. श्री.राधिका मातेस चांदीचा मुकुट, जवमणी पदक, चिंचपेटी तांबडी, हायकोल, लक्ष्मीहार व श्री. सत्यभामा मातेस चांदीचा मुकूट, ठुशी नवीन, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील सुवर्णालंकाराची लक्ष्मीपूजन म्हणून व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची दिवाळी निमित्त सुवर्ण अलंकाराची पूजा बांधण्यात आली. मंदिर व नामदेव पायरी इत्यादी ठिकाणी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर मंदिराची केलेली आकर्षक सजावट पाहून डोळ्यांचे पारणे फिटत आहे. या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं असून दिवाळीच्या आनंद पर्वानिमित्त मोठ्या संख्येने विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली आहे, असी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List